१८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्यातून प्रेरणा घेऊन वासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या भारतमातेच्या पायातल्या परदास्याच्या शृंखला तोडून तिला मुक्त करण्यासाठी हातात शस्त्र घेतले. भूमातेला मुक्त करताना आपल्याला हुतात्म्य पत्करावे लागले तरीसुद्धा मागे हटायचे नाही असा दृढ निश्चय वासुदेवरावांनी केला होता. या निश्चयाशी ते अखेरच्या श्वासापर्यंत एकनिष्ठ राहिले. देश स्वातंत्र्यासाठी केलेले प्रत्येक कार्य हे पवित्र कार्यच असते. जो आपल्याशी जसा वागतो तसेच आपण त्याच्याशी वागले पाहिजे. हा जगमान्य सिद्धांत त्यांनी आपल्या कृतीत उतरवला होता. म्हणूनच त्यांना देश स्वातंत्र्यासाठी केलेल्या कार्याचा कधीही पश्चात्ताप झाला नाही.
लोकमान्य टिळक, चापेकर बंधू, सावरकर बंधू या सर्वांना वासुदेव बळवंत फडके यांनी राष्ट्र कार्यासाठी प्रेरणा दिली. सावरकर म्हणतात, “क्रांतिवीर फडक्यांच्या सशस्त्र उठावांच्या विषयी अनेक दंतकथा आम्ही तरुण मंडळी त्यावेळच्या प्रौढांकडून मोठ्या उत्सुकतेने ऐकत होतो. आमचे क्रांतिप्रवण हृदय त्या वीर कथा ऐकताना स्फुरण पावत होते. नाशिकला मित्रमेळ्याच्या बैठकीत आमच्या राज्यक्रांतीकारक गुरुपरंपरेची जी चित्रे लावलेली होती त्यात एका शिंप्याच्या दुकानात त्याने मोठ्या भक्ती भावाने ठेवलेले फडक्यांचे एक भव्य चित्र आणून तेही आम्ही लावले होते.”
देशपारतंत्र्यात असताना देशातल्या शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. त्यांची ती अवस्था पाहून या आद्य क्रांतिकारकाच्या हृदयाला पीळ पडला. त्यांची दैनावस्था दूर करण्यासाठी त्यांनी हातात शस्त्र धारण केले. त्याचा उल्लेख करून श्रीपाद अमृत डांगे आद्य क्रांतिकारकांविषयी म्हणाले, “परकीय ब्रिटिश साम्राज्यवादी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात १८७८ मध्ये स्वातंत्र्याचा ध्वज फडकवणारे आणि सशस्त्र युद्ध पुकारणारे सरकारी नोकरीतील एक ब्राह्मण गृहस्थ आणि पुण्याचे क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके हेच होते. त्यांनी दुष्काळाने आणि सरकारी करभाराने हैराण झालेल्या सहस्रावधी शेतकऱ्यांना स्फूर्ती दिली.” वैध मार्गाने देश स्वातंत्र्यासाठी लढणारे बॅरिस्टर मुकुंदराव जयकर या आद्य क्रांतिकारका विषयी म्हणतात, “मुंबई पासून काही मैलाच्या अंतरावर राहणाऱ्या एका खेड्यातले वासुदेव बळवंत फडके यांच्या भारतमातेला स्वतंत्र करण्याच्या प्रयत्नाविषयी आम्हाला विशेष वाहवा वाटली… आमचे चित्तही विचलीत झाले.”
कर्नाटकाचे गंगाधरराव देशपांडे हे लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते. ते म्हणतात, “सातारा पुण्याकडे प्रसिद्ध असलेले वासुदेव बळवंत फडके यांनी स्वातंत्र्याच्या कल्पनेने अत्यंत धाडस करून काही शस्त्रे जमा केली… त्यांच्याविषयी काही अतिशयोक्तीपूर्ण घटना सांगितल्या जात असल्या तरी सुद्धा त्यांच्या धाडसाबद्दल आणि स्वातंत्र्याच्या चळवळीबद्दल मला लहानपणापासून आनंद वाटत असे.” या गंगाधरराव देशपांडे यांचे शिष्य पुंडलिक कातवडे म्हणतात, “आमच्या पिढीने जे क्रांतिकारक पाहिले त्या सर्वांचे स्फूर्ती स्थान वासुदेव बळवंत फडके होते… त्यांनी प्रज्वलित केलेल्या स्वातंत्र्यलढ्याच्या ज्योतीवर आपली ज्योत पेटवून घेणाऱ्या क्रांतिकारकांचे चरित्र आणि चारित्र्य हेच हिंदुस्थानचे खरे राष्ट्रीय धन आहे.”
इतिहासकार दत्तो वामन पोतदार म्हणतात, “वासुदेव बळवंत यांचे नाव मी माझ्या वडिलांच्या मुखातून अनेक वेळा ऐकले आहे. महाड तालुक्यातले बिरवाडी हे आमचे गाव! या गावी वासुदेव बळवंतांची धाड आली त्यावेळी झालेली पळापळ वडिलांनी पाहिली होती. त्यावेळी वडिलांचे वय १२-१४ वर्षांचे होते, असे माझे वडील सांगत….. वासुदेव बळवंत फडके यांचा एक पुतण्या माझा विद्यार्थी मला खूप जवळचा वाटत असे. या विद्यार्थ्यामुळेच वासुदेव बळवंत फडके हे आपल्याच घरातले थोर पुरुष आहेत असे आम्हाला वाटत असे… त्यांच्या ऋणात राहणे हेच आम्हाला भूषणास्पद वाटते.” हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचे ध्येय वासुदेव बळवंत फडके यांनी प्रथम पाहिले. त्यांच्या नंतरच्या पिढीतल्या क्रांतिकारकांनी जीवाची बाजी लावून त्यांचे ध्येय साध्य करून त्यांचे भारत मातेला दास्य मुक्त करण्याचे आद्य क्रांतिकारकांचे स्वप्न साकार केले.
वासुदेव बळवंत फडके यांच्या बंडाचे स्वरूप उग्र होते. त्यांच्या हालचालीत चपळता होती. त्यांची अशी वैशिष्ट्ये सांगताना एडमंड कॉक्स म्हणतात, “या उठावाला असे स्वरूप आले की त्याचा समाचार घेणे हे पोलिसांच्या पूर्णपणे आवाक्या बाहेरचे झाले. ते दडपण्यासाठी हिंदी सोजीरांची बरीचशी पथके त्यासाठी नियुक्त करावी लागली. त्यांनी लहान गटांनी तो प्रदेश ढवळून काढला. प्रत्येक वेळी फडके निसटून जाण्यात यशस्वी ठरले. त्यांच्या हालचाली आश्चर्यकारक वेगाने होत होत्या. त्यांना पकडण्यासाठी आम्हाला बराच वेळ लागला…. फडक्यांनी ब्रिटिश सरकारचा जुलूम असहाय्य झाला असून, तो यापुढे मुळीच सहन करता कामा नये असे घोषित करणारे विविध जाहीरनामे काढले. त्यांनी पुण्याच्या आणि साताऱ्याच्या कलेक्टरांच्या मस्तकासाठी प्रत्येकी पाच सहस्त्र रुपयांची पारितोषिके घोषित केली.”
याच घोषणा पत्रा बाबत ॲलन ऑक्टोव्हियन ह्यूम यांचा चरित्रकार लेखक वेडरबर्न लिहितो, “घडून येणाऱ्या या आंदोलनाचा अंदाज अगदी थेट मुंबई प्रांतात शेतकऱ्यांच्या बंडाच्या संबंधात जे घडले त्याप्रमाणेच होता. त्याचा आरंभ अकस्मात टोळ्याटोळ्यांनी घातलेल्या दरोड्यांनी आणि सावकारांवरील हल्ल्याने झाला. पुढे पोलिसांनाही त्या टोळ्या आवरता आल्या नाहीत. पुण्याला आलेल्या सर्व पोलीस दलाला, घोडदळाला, पायदळाला आणि तोफदळाला त्यांच्याविरुद्ध रणांगणात उतरावे लागले. पश्चिम घाटातील आरण्यांच्या प्रदेशात हिंडत असताना सैन्याशी गाठ पडताच त्या टोळ्या एखाद्या सोयीस्कर ठिकाणी लगेच एकत्र होण्यासाठी नाहीशा होत होत्या. अधिक सुशिक्षित वर्गापैकी एक नेता त्यांना लाभला होता. त्यांचा हा नेता स्वतःला दुसरा शिवाजी म्हणत असे. त्याने सरकारला आव्हान देणाऱ्या घोषणा पाठवल्या. मुंबईचे राज्यपाल सर रिचर्ड टेम्पल यांच्या मस्तकासाठी त्याने पारितोषिक घोषित केले. अगदी प्रथम मराठ्यांचे राज्य ज्या पद्धतीने स्थापन करण्यात आले होते, त्याच पद्धतीने घडून येणाऱ्या एका राष्ट्रीय बंडाचे नेतृत्व आपण हाती घेतले आहे असे घोषित करणारा वासुदेव बळवंत फडके नावाचा बंडखोर होता.” देश स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा लढा देण्यास नंतरच्या पिढीला प्रेरणा देणारे आणि ब्रिटिश सरकारला सळोकीपळो करून सोडणारे आणि त्यांच्या उरात धडकी भरवणारे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना १४० व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
(लेखक व्याख्याते आहेत.)
संपर्क – ९८३३१०६८१२