कुर्ला एल-विभागातील अभियंत्यांची आता अशीही मागणी

न्याय मागायचा तरी कुठे, असा सवाल अभियंत्यांकडून केला जात असून याप्रकरणी आयुक्त इक्बालसिंह चहल काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

94

कुर्ल्यातील महापालिकेच्या एल-विभाग कार्यालयामध्ये मागील शनिवारी घडलेल्या प्रकारानंतर सर्वच अभियंत्यांची आता या विभागात काम करण्याची मानसिकता राहिलेली नाही. सहायक आयुक्त कोणतेही सहकार्य करत नाही आणि वरिष्ठ अधिकारी ठोस भूमिका घेत नसल्याने एकतर आमची तरी या विभागातून बदली करा, नाहीतर सहायक आयुक्तांना तरी बाजूला करा, अशी आग्रही भूमिका इमारत व कारखाने विभागातील सर्वच अभियंत्यांनी घेतली आहे.

अभियंत्यांमध्ये नाराजी

कुर्ला ‘एल’-विभागाच्या सहायक आयुक्तांच्या दालनामध्ये आयोजित बैठकीत स्थानिक आमदार दिलीप लांडे यांनी इमारत व कारखाने सहायक अभियंता किरणकुमार अन्नमवार यांच्यासोबत असभ्य वर्तन करत अपशब्द वापरले. हा प्रकार घडत असताना ‘एल’ विभागाच्या सहायक आयुक्तांनी आमदारांना कोणत्याही प्रकारची समज दिली नाही व आमदारांच्या असंविधानिक वर्तणुकीस मूक संमतीच दर्शवल्याने अभियंते प्रचंड नाराज आहेत.

(हेही वाचाः साहाय्यक आयुक्तांकडून आमदारांची पाठराखण, अभियंत्यांचे खच्चीकरण)

लोकप्रतिनिधींची पाठराखण

इमारत व कारखाने विभागातील कोणत्याही अभियंत्यांची सध्या काम करण्याची मानसिकता नाही. त्यामुळे एल विभागाचा अतिरिक्त कारभार असलेल्या एच-पूर्व विभागाच्या सहायक आयुक्त अलका ससाणे या अभियंत्याच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी लोकप्रतिनिधींची पाठराखण करत असल्याने अभियंत्यांनी परिमंडळ-५चे उपायुक्त आणि नगर अभियंता यांची भेट घेऊन कैफियत मांडली.

आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष

अशा वातावरणमध्ये आम्ही काम करू शकणार नाही. त्यामुळे त्यांच्याकडील अतिरिक्त कारभार काढून दुसऱ्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अन्यथा आमची तरी बदली करावी, अशी मागणी सर्व अभियंत्यांनी केली आहे. एरव्ही अभियंत्यांना मारहाण झाली की महापालिका अभियंत्यांच्या संघटना तसेच महापालिका कर्मचारी संघटना पुढे येत असल्या तरी या प्रकरणात युनियनही राजकीय पक्षाच्या दबावाखाली असल्याने, त्यांनी याप्रकरणात मौन धारण केले आहे. त्यामुळे न्याय मागायचा तरी कुठे, असा सवाल अभियंत्यांकडून केला जात असून याप्रकरणी आयुक्त इक्बालसिंह चहल काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

(हेही वाचाः गौरी-गणपतीनंतर मुंबईत पुन्हा लॉकडाऊन?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.