कुर्ला पूर्व येथील नाईक नगर येथील तीन मजली इमारतीचा भाग सोमवारी, 27 जून रोजी मध्यरात्री कोसळला. रात्री बाराच्या सुमारास झालेल्या या इमारत दुर्घटनेत रात्री एक वाजेपर्यंत सात जणांना बाहेर काढण्यात अग्निशमन दल आणि स्थानिकांना यश आलं होतं. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली २० ते २५ जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जखमींना रुग्णालयात दाखल
या सातही जखमींना रहिवाश्यांना राजावाडी व सोमय्या रुग्णालय तसेच नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आल्याची प्राथमिक माहिती मुंबई महानगर पालिका आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडून प्राप्त झाली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अजून मोठ्या प्रमाणात रहिवाशी अडकले गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इमारत खासगी मालकीची
कुर्ला पूर्व येथील शिवसृष्टी रोड वरील नाईक नगर सोसायटीतील एका तीन मजली इमारतीच्या एका विंगचा भाग पूर्णपणे कोसळला. ही इमारत खाजगी मालकीची होती. रात्री बाराच्या सुमारास झालेल्या या इमारत दुर्घटनेची वर्दी मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांसह महापालिकेच्या विभागीय आपत्कालीन नियंत्रण पथकाचे जवान घटनास्थळी रवाना झाले. या सर्व पथकातील जवानांनी बचाव कार्य राबवून इमारतीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या लोकांचा शोध घेऊन त्यांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. रात्री एक वाजेपर्यंत ७ रहिवाश्यांना बाहेर काढण्यात यश आले होते. यातील तीन रहिवाशांना राजावाडीत, तर दोन रहिवाशांना सोमय्या आणि दोन अन्य रहिवाशांना इतर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेची वर्दी मिळताच एका अग्निशमन दलाचे दहा फायर इंजिन, दोन रेस्क्यू व्हॅन, यासह १०८ क्रमांकाच्या सहा रुग्णवाहिका तसेच अग्निशमन दलाचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि महापालिकेचे आपत्कालीन विभागाची सर्व यंत्रणा घटनास्थळी तैनात होऊन मदत कार्याला सुरुवात करण्यात आली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले गेल्याची शक्यता वर्तवली जात असून त्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाचे जवान आणिइतर आपत्कालीन यंत्रणांचे जवान करत आहेत.
Join Our WhatsApp Community