म्युनिसिपल मजदूर युनियन, मुंबई आणि म्युनिसिपर इंजिनिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष साथी सुखदेव काशिद यांचे गुरुवारी १ सप्टेंबर २०२२ रोजी हृदय विकाराच्या झटक्याने मुलुंड येथील हिरा मोंगी हॉस्पीटलमध्ये निधन झाले आहे. कामगार नेते शरद राव यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटनेची धुरा वाहणाऱ्या काशिद यांचे निधन हे त्यांचे गुरु असलेल्या शरद राव यांच्या सहाव्या स्मृतीदिनाच्या दिवशीच झाल्याने शिष्यानेही गुरुच्या स्मृतीदिनीच जगाचा निरोप घेतला हा योगायोग ठरला आहे. ते ६२ वर्षांचे होते. त्यांच्या मृत्यु पश्चात त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी व नात असा परिवार आहे.
कामगार नेते सुखदेव काशिद यांचे पार्थिव त्यांच्या रहाते निवासस्थान असलेल्या निलम सेनरूफ सेंच्युरा टॉवर, ए १०१-१०२, पहिला मजला, गोरेगांव, मुलुंड लिंक रोड, नाहूर रेल्वे स्टेशन समोर, नाहूर (पूर्व), मुंबई ४०० ०८१ येथून दि. २ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ९ वाजता अत्यंदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर साडेनऊ वाजता त्यांच्या रहात्या घरापासून ते टाटा कॉलनी स्मशानभूमी, वीर सावरकर रोड, मुलुंड पूर्व येथे नेण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.
महापालिका कामगारांच्या हक्कासाठी दिवस-रात्र गेली ४० वर्षांहून अधिक कार्यरत असणाऱ्या या लाडक्या व कामगरांची बुलंद तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ह्या नेत्याच्या निधनाने संपूर्ण महापालिका, कामगार, कर्मचारी, अधिकारी शोकानुकुल झाले आहेत. काही वर्ष किडनीच्या विकाराने त्रस्त झाल्यावर आठवड्यातून तीन वेळा त्यांच्यावर डायलसीसचे उपचार चालू असतानाही त्यांनी आपल्या कामामध्ये खंड पडू दिला नाही. शरद राव यांच्या आजारपणात तसेच त्यांच्या मृत्युनंतर अतिशय खंबीरपणे महापालिका कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांचे नेतृत्व त्यांनी अतिशय प्रभावीपणे पार पाडले. त्यांच्या निधनाने एक अतीशय तडफदार कामगार नेता अकाली हरपल्यामुळे संपूर्ण महापालिकेतील कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांमध्ये पोकळी निर्माण झाल्याची भावना निर्माण झालेली आहे.
कामगार नेते जॉर्ज फर्नांडीस व शरद राव यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेले सुखदेव काशिद यांनी कामगार संघटनेत काम करताना आपल्या वकिली शिक्षण पूर्ण केले, मात्र त्यांनी आपला विकली पेशा व्यावसायिक म्हणून न स्विकारता आपले संपूर्ण आयुष्य कामगार, कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी समर्पित केले.
पुण्यातील पुरंदर तालुक्यातील मांढर गावातील शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या काशिद यांनी आपल्या कामातून आपले नेतृत्व सिध्द केले. एवढेच नव्हे तर चतुर्थ श्रेणी कामगारांबरोबर अधिकारी यांचे देखील नेतृत्व केले. अग्निशमन दल असो किंवा अभियांत्रिकी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेले काम आजही त्यांच्या कामाचा ठसा उमटवत आहे, अशी भावना म्युनिसिपल मजदूर युनियनचे उपाध्यक्ष रमेश भूतेकर-देशमुख व बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनीअर युनियनचे कार्याध्यक्ष साईनाथ राजाध्यक्ष यांनी व्यक्त केली. एवढेच नव्हे तर अनेक राजकीय नेत्यांशी देखील त्यांचे सलोख्याचे संबंध होते. विशेषतः मा. नामदार शरदचंद्रजी पवार, मा. ना. अजितदादा पवार यांच्याशी असलेल्या संबंधामुळे शरद रावांबरोबर त्यांनीही राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला होता. मात्र कामगार संघटना हाच ध्यास घेऊन जगणाऱ्या काशिद साहेबांना राजकारणापेक्षा कामगार क्षेत्र हेच आपले उद्दिष्ट मानून जीवन व्यतित केले.
त्यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ, कुटुंब वत्सल असल्यामुळे त्यांनी अतिशय कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांमध्ये मैत्रीपूर्ण संबंधि प्रस्तापित केले होते. मात्र कामगार, कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढताना वेळप्रसंगी ते मैत्रीपूर्ण संबंध बाजूला सारून जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत लढत असत. कामगारांमध्ये बसून त्यांच्या डब्यातील भाजी, भाकरी खाणार त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारा नेता अपवादानेच आढळतो. तसेच त्यांच्या कुटुंबीयांशी जवळीक निर्माण करणारे नेते असल्यामुळे कामगारांमध्ये त्यांच्या विषयी एक मोठा भाऊच असल्याची भावना होती,अशीही भावना भुतेकर यांनी व्यक्त केली.