महापालिकेत नोकरी लावते, असे सांगून अधिकारी महिलेने तरुणांना घातला गंडा

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांकडून २ कोटी २७ लाख रुपये उकळल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई महापालिकेत अधिकारी पदावर असणाऱ्या प्रांजली भोसले या महिलेने पतीच्या आणि नातलगांच्या मदतीने अनेक तरुणांना कोट्यावधींचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोट्यावधींची फसवणूक करुन गोव्यात पतीसोबत मज्जा मारणाऱ्या या अधिकारी महिलेला तिच्या पतीसह गोव्यातून अटक करण्यात आली आहे. तसेच ठाणे आणि कल्याण येथून तिच्या दोन नातलगांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. या चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशी करत होती फसवणूक

मुंबई महापालिकेच्या विविध खात्यांत नोकरी लावते असे सांगून, प्रांजली भोसले या महिलेने तिचे पती लक्ष्मण भोसले नातलंग राजेश अनंत भोसले आणि महेंद्र बळीराम भोसले यांच्या मदतीने अनेक तरुणांकडून कोट्यावधी रुपये उकळले होते. नोकरीसाठी या तरुणांनी तगादा लावताच प्रांजली भोसले हीने टाळाटाळ करायला सुरुवात केली. अखेर काही तरुणांनी मुलुंड येथील नवघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. नवघर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन या महिलेचा शोध सुरु केला होता. मात्र ती तिच्या राहत्या ठिकाणाहून आपल्या पतीसह मागील वर्षभरापासून गायब झाली होती.

(हेही वाचाः भरदिवसा दागिन्यांच्या दुकान मालकावर गोळीबार!)

अशी केली अटक

या गुन्ह्याचा समांतर तपास करणाऱ्या गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने याबाबत माहिती मिळवली असता, प्रांजली भोसले ही मनपाच्या शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकरी असल्याचे कळले. तसेच ऑक्टोबर २०२० पासून ती कामावर गैरहजर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. प्रांजली हीचा शोध घेत असताना, ती पतीसह गोव्यात असल्याची माहिती मालमत्ता कक्षाला मिळाली. मालमत्ता कक्षाचे अधिकारी यांनी गोवा येथे जाऊन गोवा पोलिसांच्या मदतीने प्रांजली भोसले आणि तिचा पती लक्ष्मण भोसले या दोघांना अटक करुन मुंबईत त्यांना आणले. तसेच इतर सहकारी नातलंग यांना कल्याण आणि ठाणे येथून अटक करण्यात आली आहे.

(हेही वाचाः मुलांना भूक लागली… म्हणून वडिलांनी असे काही केले ज्यामुळे झाला मुलाचा मृत्यू)

चौकशीत या टोळीने नोकरीचे आमिष दाखवून नोकरीच्या शोधात असणाऱ्यांकडून २ कोटी २७ लाख रुपये उकळल्याची माहिती समोर आली आहे. हा फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here