लालबाग हत्याकांड- वीणा जैनच्या मृत्यूचे गूढ वाढले; हत्या की अपघात शवविच्छेदन अहवालात होईल स्पष्ट

“मी आईची हत्या केली नाही.  बाथरूम जात जाताना तीचा तोल जाऊन ती पहिल्या मजल्यावरून खाली पडली. त्यात तिचा मृत्यू झाला, असे लालबाग हत्याकांड प्रकरणात अटक करण्यात आलेली आरोपी मुलगी रिम्पल हीने पोलिसांच्या चौकशी सांगितले आहे. २७ डिसेंबर रोजी पहाटे ५५ वर्षीय वीणा जैन पहिल्या मजल्यावरून खाली पडल्या होत्या. तेव्हा मुलगी रिम्पलने आईला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन न जाता दोन हॉटेल कर्मचाऱ्यांच्या मदतीने तीला घरी आणून ठेवले होते. त्याचवेळी तीचा मृत्यू झाला असावा, असा कयास लावला जात असला तरी, पोलीस मात्र शवविच्छेदन अहवालाची वाट बघत असून त्यातच वीणा यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होईल असे पोलिसांचे म्हणणे आहे.

लालबाग येथे उघडकीस आलेल्या वीणा जैन हत्याकांड प्रकरणाला नवीन वळण येण्याची शक्यता आहे. वीणा जैन या हत्या प्रकरणात काळाचौकी पोलिसांनी जैन यांच्या २४ वर्षीय मुलगी रिम्पल हिला अटक केली आहे. न्यायालयाने तिला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ती काळाचौकी पोलिसांच्या कोठडीत असून तिच्याकडे आईची हत्या कशी व का केली, या हत्याकांडात कोणी मदत केली का ? याबाबत चौकशी सुरू आहे. मात्र, ती पोलिसांना एकच उत्तर देत आहे, मी हत्या केलेली नसून आई पहिल्या मजल्यावरून पडली त्यात तिचा मृत्यू झाला.

वीणा जैन हिचा मृतदेह १४ मार्च रोजी रात्री तिच्या राहत्या घरात पाच तुकड्यांमध्ये कुजलेल्या अवस्थेत मिळाला होता. मुलगी रिम्पल ही आईच्या मृतदेहासोबत मागील ३ महिन्यांपासून राहत होती. पोलिसांना घरात इलेक्ट्रिक मार्बल कटर, कोयता आणि सुरा सापडला आहे. या हत्यारांच्या साहाय्याने वीणा हिच्या मृतदेहाचे तुकडे करून ते कपाटात दडवून ठेवण्यात आले असल्याची प्राथमिक तपासात ही माहिती समोर आली होती.

या प्रकरणात रिम्पलला अटक करण्यात आली आहे. तिच्याजवळून पोलिसांनी तिचा मोबाईल फोन जप्त केला आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत २७ डिसेंबर रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास वीणा जैन घराबाहेर असलेल्या शौचालयात जात असताना तोल जाऊन पहिल्या मजल्यावरून खाली पडल्या. त्याचवेळी त्याच चाळीत राहणाऱ्या एका हॉटेल कर्मचा-याने रिम्पलला आई खाली पडल्याची माहिती दिली आणि रिम्पलने त्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने आई वीणाला घरी घेऊन आली होती. त्यावेळी वीणा हिची कुठलीही हालचाल होत नव्हती, म्हणून तिला घरी घेऊन येणाऱ्या हॉटेल कर्मचाऱ्याने नातेवाईकांना कळवं असे रिम्पलला सांगितले. परंतु तू जा मी बघते काय करायचे ते असे बोलून हॉटेल कर्मचा-याला जाण्यास सांगून रिम्पलने दार लावून घेतले, असा जबाब वीणा जैनला घरी घेऊन आलेल्या हॉटेल कर्मचा-याने पोलिसांना दिला आहे.

( हेही वाचा: शेतक-यांचे आंदोलन स्थगित; सरकारने मान्य केल्या 70 टक्के मागण्या )

वीणा जैन या अशक्त होत्या. त्यात त्या पहिल्या मजल्यावरून पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा. त्यानंतर आईला आपण मारले म्हणून आपल्यावर सर्वजण आरोप करतील, या भीतीने रिम्पलने याबाबत नातेवाईकांना कळवले नाही. त्यानंतर मात्र आईच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी रिम्पलने मृतदेहाचे तुकडे करून ते कपाटात आणि पिंपात लपवून ठेवले असावे व यासाठी तिने कोणाची तरी मदत घेतली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. परंतु वीणा जैन हिच्या मृत्यूचा अहवाल जोपर्यंत येत नाही तोपर्यत मृत्यूचे नेमके कारण कळणार नाही? असे पोलिसांचे म्हणणे आहे.

दरम्यान, काळाचौकी पोलिसांनी रिम्पलच्या संपर्कात असलेल्या नातेवाईक व्यतिरिक्त पाच जणांचे जबाब नोंदवले असून रिम्पलच्या सतत संपर्कात असलेला सँडविच विक्रेता बॉबी याला शुक्रवारी लखनौमधून ताब्यात घेण्यात आले आहे. बॉबी याचा या प्रकरणात काय भूमिका आहे, याबाबत पोलीस त्याच्याकडे चौकशी करीत असल्याचे पोलीस उपायुक्त डॉक्टर  प्रवीण मुंढे यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here