लालबागच्या मिरवणुकीत चोरांचा सुळसुळाट; तब्बल ५० फोन, दागिने लंपास

178

मुंबईत अनंत चतुर्दशीच्या लालबाग-परळ भागातून गणपती बाप्पाच्या मिरवणुका मोठ्या जल्लोषात निघाल्या होत्या. दोन वर्षांनी यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव होणार असल्याने भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. याच गर्दीचा फायदा काही चोरांनी घेत या मुंबईतील मिरवणुकांमध्ये चोरट्यांनी तब्बल ५० मोबाईल फोन आणि सोन्याचे दागिने लंपास केले आहेत.

( हेही वाचा : डिझेल बसेसच्या जागी इलेक्ट्रिक बसचा वापर करा गडकरींचे आवाहन)

गणपती मिरवणुकीत चोरांचा सुळसुळाट 

गणपती मिरवणुकीत चोरीला गेलेल्या सामानाची तक्रार करण्यासाठी काळाचौकी पोलीस ठाण्यात गणेशभक्तांनी गर्दी केली. लालबागचा राजा गणपती मिरवणुकीत मोठी गर्दी जमली आणि चोरांनी गर्दीचा फायदा घेऊन अनेक गणेशभक्तांचे किमती साहित्य चोरले. या घटना दुपारी एक ते दीड वाजण्याच्या दरम्यान घडल्याची माहिती देण्यात आली आहे. काळाचौकी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी झारखंडमधून गणपती उत्सवादरम्यान मोबाईल चोरी करण्यासाठी आलेल्या दोन तरूणांना अटक केली होती.

शुक्रवार आणि शनिवारी दुपारपर्यंत ५० पेक्षा अधिक मोबाईल चोरीच्या तक्रारी दाखल करण्यात आलेल्या असून २०पेक्षा अधिक सोनसाखळी चोरीच्या तक्रारी दाखल करण्यात आलेल्या आहेत. आताही अनेक जण आपल्या तक्रारी दाखल करण्यासाठी येत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. एकाच ठिकाणी घडलेल्या चोरीच्या घटनेचा एकत्रित गुन्हा दाखल करून एकत्रित तपास करण्यात येईल असेही एका अधिकाऱ्याने सांगितले.

या टोळ्यांनी केवळ लालबागच्या हद्दीतच नाही तर लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गेली त्या ठिकाणी देखील चोरीच्या तक्रारी दाखल होत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. गिरगाव चौपाटी या ठिकाणी देखील अनेकांचे मोबाईल फोन सोनसाखळ्या चोरीला गेल्याच्या घटना घडल्या असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. डी. बी.मार्ग पोलीस ठाण्यात देखील चोरीच्या तक्रारी दाखल होत असल्याची माहिती समोर येत आहे. शिवाजी पार्क, दादर, माहीम,सांताक्रूझ, मालवणी,वर्सोवा या ठिकाणी देखील चोरीच्या घटना घडल्या असून पोलिसांनी अद्याप गुन्ह्याची अधिकृत आकडेवारी अद्याप जाहीर केलेली नाही.

टोळ्यांच्या शोधासाठी सीसीटीव्ही, वृत्तवाहिन्यांची मदत..

मोबाईल चोराचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विसर्जन मिरवणूक मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे, त्याच बरोबर विसर्जन मिरवणूका वृतांकन करणाऱ्या वृत्तवाहिन्यांच्या कॅमेराचे फुटेज तपासले जाणार असून या सर्व फुटेजमधून संशयितांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.