महाबळेश्वर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात दरड कोसळण्याचे सत्र सुरू आहे. त्यातच आज, शुक्रवारी सातारा-महाबळेश्वर घाट रस्त्यावर मोठी दरड कोसळली. सातारा-महाबळेश्वर रस्ता पूर्णतः वाहतुकीसाठी बंद झाला आहे.
(हेही वाचा – तुमचा EMI महागणार, RBI कडून रेपो दरात 50 बेसिस पॉईंट्सची वाढ)
सातारा जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांपासून मुसळधार पाऊस सुरू होता. या परतीच्या पावसाने सातारा जिल्ह्यात धुमाकूळ घातला. महाबळेश्वर सातारा घाट रस्ता हा वाहतुकीसाठी नेहमीच गजबजलेला असतो. मात्र या मार्गावरील केळघर घाटात शुक्रवारी सकाळी दरड कोसळल्याचे समोर आले.
महाबळेश्वर-सातारा या मार्गावरील केळघर घाटात दरड कोसळल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळे वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. असे असतानाही अद्याप दरड हटवण्यास सुरूवात केली नसल्याचे सांगितले जात आहे. या घाटात सातत्याने दरडी कोसळण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. पावसाळ्यात हा रस्ता किमान चार महिन्यात दहा ते बारा वेळा बंद होतो.