डोंबिवलीतील पीडितेवर शेवटी झालेला बलात्कार टाळता आला असता, पण…

पीडितेला घेऊन जाणा-या नराधमांचा पाठलाग चालू होता. पण त्याचवेळी...

92

डोंबिवलीत १५ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना समोर आल्यानंतर, पोलिसांनी ३३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करुन काही तासांतच २६ आरोपींना अटक केली आहे. जानेवारी पासून सुरू असणाऱ्या बलात्काराच्या घटनेला २२ सप्टेंबर रोजी ब्रेक लागला आणि ही धक्कादायक घटना समोर आली.

असा उघडकीस आला प्रकार

या घटनेची आणखी एक बाजू समोर आली आहे ती म्हणजे जर कुटुंबीयांनी वेळीच पोलिसांना कळवले असते, तर २२ सप्टेंबर रोजी या पीडित मुलीवर झालेला बलात्कार थांबवता आला असता. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि तिची मामी दोन आठवड्यांपूर्वी एका वाढदिवसाच्या कार्यक्रमाला गेले होते. त्या वाढदिवसाच्या ठिकाणी मुलीचे विचित्र वागणे मामीच्या लक्षात आले. ती सतत फोनवर कुणाशी तरी बोलत होती, मध्येच चॅटिंग करत होती. तिच्या या वागण्यामुळे मामीला तिच्यावर संशय आला आणि त्या दिवसापासून मामीने पीडित मुलीवर पाळत ठेवली. आठवडाभर पाळत ठेवल्यानंतर मुलीच्या वागण्यात बदल जाणवू लागल्यामुळे मामीने तिला विश्वासात घेऊन बोलते केले असता, हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

(हेही वाचाः डोंबिवली हादरली! ३३ जणांनी केला ९ महिने बलात्कार)

रिक्षा पंक्चर झाली आणि…

मामीने हा प्रकार पीडित मुलीच्या कुटुंबीयांच्या कानावर घालून, या मुलांना पुराव्यासह पकडण्यासाठी एका समाज सेवकाच्या मदतीने योजना आखली. कुटुंबीयांनी मुलीला विश्वासात घेऊन मुलांना २२ सप्टेंबर रोजी भेटायला बोलावण्यास सांगून, त्यांच्यासोबत ते जिथे घेऊन जातील तिथे जाण्यास सांगितले. २२ सप्टेंबर रोजी दुपारी पीडित मुलीने बोलावलेल्या मित्रांपैकी काही मित्र आले व तिला रिक्षाने घेऊन निघाले. त्यांच्या पाठोपाठ मुलीची मामी, समाजसेवक आणि कुटुंबातील काही सदस्य दुसऱ्या रिक्षाने पाठलाग करू लागले. परंतु वाटेतच मुलीच्या कुटुंबीयांच्या रिक्षाचे चाक पंक्चर झाले आणि मुलीला घेऊन निघालेली रिक्षा पुढे निघून गेली.

पोलिस पोहोचले पण…

मुलीने काही वेळाने तिच्या मोबाईल वरुन तिचे लोकेशन मामीला पाठवले. पण घाबरलेल्या कुटुंबीयांनी पोलिसांना याबाबत कळवले आणि मुलीने पाठवलेल्या लोकेशनवर शोध घेत, अखेर कोळेगाव परिसरात ते पोहचले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. मुलीच्या मित्रांनी तिच्यावर अत्याचार केला होता, सदर ठिकाणी पोलिस आणि कुटुंबीय पोहोचताच पोलिसांना बघून मुलांनी तेथून पळ काढला. मात्र दोन जण पोलिसांच्या तावडीत सापडले.

(हेही वाचाः राज्यात महिला सुरक्षित? गेल्या काही दिवसांत घडल्या ‘इतक्या’ बलात्काराच्या घटना)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.