मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचे गूढ हळूहळू वाढत चालले आहे. मनसुख यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीत मिळाला असला तरी त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन रात्री वसई येथील एका गावातील दाखवत होते, अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे. यामुळे मनसुख यांच्या मृत्यूचे गूढ अधिकच वाढत चालले असून वसईचे काय कनेक्शन आहे, याचा तपास यंत्रणा शोध घेत आहे.
रात्री १० वाजल्यानंतर मनसुख यांचा मोबाईल फोन बंद झालेला!
ठाण्यातील खोपट येथील विकास पाम येथे राहणारे मनसुख हिरेन यांची चोरीला गेलेली स्कॉर्पिओ मोटार २५ फेब्रुवारी प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानासमोर स्फोटकांनी भरलेल्या स्थितीत मिळाली होती. त्यानंतर मनसुख हे पोलिसांच्या रडारवर आले होते. मात्र त्यांची मोटार ही विक्रोळी येथून चोरीला गेली होती व या प्रकरणी त्यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली होती. त्यानंतर मनसुख यांना सतत मुंबई गुन्हे शाखा, एनआयए, एटीएस यांच्याकडून चौकशीसाठी बोलावण्यात येऊ लागले होते. दरम्यान गुरुवारी रात्री मनसुख यांना कांदिवली क्राईम ब्रांच अधिकारी तावडे या नावाने फोन करून त्यांना घोडबंदर रोड येथे बोलावून घेतले होते. त्यानंतर रात्री १० नंतर मनसुख यांचा मोबाईल फोन बंद झाला होता.
(हेही वाचा : मनसुख हिरेन यांची फसवून हत्या! नातलगांचा आरोप )
मनसुख यांना पोलीस अधिकाऱ्याने घोडबंदर येथे भेटण्यासाठी बोलावलेले!
दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मनसुख यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर खाडीत सापडला होता. दुपारी मृतदेहाची ओळख पटवण्यात आल्यानंतर मनसुख यांच्या मृत्युने राज्यात खळबळ उडवून दिली. मनसुख यांच्या मृत्यूमुळे मुंबई पोलीस दलातील काही अधिकारी अडचणीत आले आहे. दरम्यान ठाणे पोलिसांनी मनसुख त्यांच्या मोबाईचे लोकेशन तपासले असता गुरुवारी रात्री १०:३० वाजता मनसुख यांच्या मोबाईल फोनचे शेवटचे लोकेशन वसई तालुक्यातील एका गावात दाखवत होते, त्यानंतर त्यांचा मोबाईल फोन बंद झाला, अशी माहिती खुद्द पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी दिली. मनसुख यांना फोन करणाऱ्या अधिकाऱ्याने त्यांना घोडबंदर येथे भेटण्यासाठी बोलावले होते, मग त्यांच्या मोबाइल फोनचे लोकेशन वसई येथे कसे काय दाखवत होते, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मनसुख यांचा मृतदेह रेतीबंदर येथील खाडीत चिखलात रुतलेला मिळून आल्यामुळे मृत्यूचे गूढ आणखीनच वाढले आहे.
अनेक प्रश्न निर्माण झाल्याने गोंधळ!
मनसुख हे घोडबंदरला गेले होते? की दुसरीकडे गेले होते? मनसुख त्यांच्या मृतदेहाजवळ पाकीट देखील मिळाले नाही, तसेच मनसुख यांच्या तोंडावर मिळालेले रुमाल कुठून घेण्यात आले होते? याचा शोध घेण्यासाठी पोलीस मनसुख यांच्या घरापासून सीसीटीव्ही फुटेज शोधत आहेत. ठाणे पोलिसांनी त्यांच्या मोबाईल फोनचा सीडीआर काढण्यात येत असून मनसुखला गुरुवारी रात्री फोन करणारी व्यक्ती कोण आहे, याचा शोध घेण्यात येत आहे.