सुप्रसिद्ध आणि ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिल्या जाणाऱ्या ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ सोहळ्याचे मुंबईत नुकतेच आयोजन करण्यात आले होते. देशासाठी आणि समाजासाठी योगदान देणाऱ्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वप्रथम हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. यावर्षीचा ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांना ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. (Lata Deenanath Mangeshkar Award)
या सोहळ्यात प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांना संगीत क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेसाठी, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना नाट्य,चित्रपट, मालिका क्षेत्रातील योगदानासाठी, अभिनेते अतुल परचुरे यांना नाट्यक्षेत्रातील कार्यासाठी, अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांना अभिनय क्षेत्रातील योगदानासाठी, तर गायक रूपकुमार राठोड यांना हिंदुस्थानी संगीतातील योगदानासाठी मास्टर दीनानाथ पुरस्कार प्रदान करण्यात आला. उत्कृष्ट चित्रपटनिर्मितीसाठी विशेष वैयक्तिक पुरस्कार रणदीप हुड्डा यांना प्रदान करण्यात आला. पुरस्कार सोहळ्यानंतर श्रीशारदा विश्वमोहिनी लतादीदी हा संगीतमय कार्यक्रम सादर करण्यात आला.
मुंबईतील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे बुधवारी, (२४ एप्रिल) झालेल्या या कार्यक्रमात हुडा यांनी कृतज्ञता व्यक्त केली आणि वीर सावरकर यांच्याशी जवळचा संबंध असलेल्या कुटुंबाकडून पुरस्कार मिळणे, हा माझा खास सन्मान असल्याचे तो म्हणाला. (Lata Deenanath Mangeshkar Award)
हा माझ्यासाठी खूप अभिमानाचा क्षण…
स्वातंत्र्य वीर सावरकर या चित्रपटाचे अभिनेता आणि दिग्दर्शक रणदीप हुड्डा यांना विशेष वैयक्तिक पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, “माझ्यासाठी हा खूप खास क्षण आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या चरित्रपटासाठी पुरस्कार मिळणे, हा माझ्यासाठी खूप अभिमानाचा क्षण आहे.”
(हेही वाचा – D. Gukesh : ‘विश्वनाथन आनंद यांच्या मदतीशिवाय इथपर्यंत पोहोचलोच नसतो,’ – गुकेश )
मी स्वत:ला कधीही या पुरस्कारायोग्य समजले नाही
‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्काराचा स्वीकार करताना अभिनेते अमिताभ बच्चन म्हणाले की, ‘मी स्वत:ला कधीही या पुरस्कारायोग्य समजले नाही, पण ह्रदयनाथ मंगेशकरजी यांनी मी या सोहळ्याला येण्यासाठी बरेच प्रयत्न केले. गेल्यावर्षी त्यांनी मला या सोहळ्याकरिता आमंत्रित केले होते.’ पुढे ते ह्रदयनाथ मंगेशकर यांना उद्देशून म्हणाले की, ‘ह्रदयनाथजी, मी यापूर्वी झालेल्या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहू शकलो नाही, यासाठी तुमची क्षमा मागतो. त्यावेळी मी तुम्हाला सांगितले होते की, मी आजारी आहे, पण प्रत्यक्षात माझी तब्येत ठीक होती, पण मला इथे यायचे नव्हते. यावर्षी माझ्याकडे कोणतीही कारणे नव्हती, म्हणून मला इथे यावे लागले.’
हेही पहा –
Join Our WhatsApp Community