चिंताजनक बातमी! लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा खालावली

ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये लता मंगेशकरांना पुन्हा व्हेंटिलेटरवर हलविले

121

ज्येष्ठ गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांची प्रकृती शनिवारी पुन्हा बिघडल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले आहे.

डॉ. प्रतीत समदानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, लता मंगेशकर यांचे वय ९२ वर्षे असल्याने त्यांना सुरुवातीपासूनच आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती आज पुन्हा खालावली, त्यामुळे त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले. लता मंगेशकर यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथक सातत्याने लक्ष ठेवून आहे. लता मंगेशकर यांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली आहे, त्यामुळे त्यांच्यावर औषधाचा प्रभाव फारच कमी होत आहे. अचानक शनिवारी त्यांची तब्येत पुन्हा ढासळली. लतादीदींना पुन्हा कृत्रिम श्वासोच्छवास दिला जात असून, डॉक्टरांची टीम त्यांच्यावर लक्ष ठेवून असल्याची माहितीही डॉ प्रतीत समदानी यांनी दिली.

दरम्यान, लता मंगेशकर यांना 8 जानेवारीला कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातच लता दीदींना न्यूमोनिया झाल्याचे निदान झाले. तेव्हापासून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. 22 जानेवारीला लता मंगेशकर कोरोना आणि न्यूमोनियामुक्त झाल्या. त्यांची प्रकृतीही बरीच सुधारली होती, त्यामुळे व्हेंटिलेटर काढून टाकण्यात आले होते, पण त्यांचे वय पाहता त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. आज त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने वैद्यकीय पथकाने लता दीदींना पुन्हा व्हेंटिलेटरवर हलवले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.