अखेरचा हा तुला दंडवत…! लता दीदी अनंतात विलीन

76

आपल्या स्वराने ज्यांची ओळख अजरामर झाली, ज्यांच्या स्वर्गीय सुरांनी अनेक दशकं, अनेक पिढ्यांच्या मनावर अधिराज्य केलं, त्या स्वरसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांची प्राणज्योत अखेर मालवली. रविवारी सकाळी ८.१५ च्या सुमारास मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात वयाच्या ९२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. फुलाने सजवलेल्या लष्काराच्या  वाहनातून निवासस्थान प्रभूकुंज ते छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (शिवाजी पार्क) पर्यंत दीदींची अंत्ययात्रा निघाली. शिवाजी पार्क येथे लता दीदींना तिन्ही दलाच्या सैन्यांकडून अखेरची मानवंदना देण्यात आली. अशा रीतीने भारतरत्न लता दीदींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लता दीदी यांचे बंधू पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी लता मंगेशकर यांना मंत्राग्नी दिला. यावेळी लता दीदींच्या लाखो चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली.

( हेही वाचा : नाम गुम जाएगा चेहरा ये बदल जायेगा मेरी आवाज़ ही पहचान है…देशभरातून शोक व्यक्त )

पंतप्रधान मोदींनी घेतले अखेरचे दर्शन

भारतरत्न लता मंगेशकर यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सायंकाळी मुंबईत दाखल झाले. शिवाजी पार्कात पंतप्रधानांनी लता दीदींचे अंतिम दर्शन घेत मंगेशकर कुटुंबियांची वैयक्तिक भेट घेत सांत्वन केले, यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हेसुद्धा उपस्थित होते. यानंतर, सर्व दिग्गजांसह सामान्य लोकांनी लता दीदींचे अंतिम दर्शन घेतले. तसेच भारतीय लष्कारानेही दीदींना मानवंदना दिली.

Modi Tribute

‘दीदी आपका नाम रहेगा’

लता दीदींना अखेरचा निरोप देताना त्यांच्या चाहत्यांना अश्रू अनावर झाले. याप्रसंगी “जब तक, सुरज चाँद रहेगा, दीदी आपका नाम रहेगा” असे बोलत अनेक चाहते आपल्या भावना व्यक्त करत होते. संगीत क्षेत्रातील एका पर्वाचा अंत झाला असे म्हणत, दिग्गजांनी लता दीदींना श्रद्धांजली वाहिली.

Tai truck

या अतिमहत्वाच्या व्यक्तींनी घेतले अंतिम दर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे, पालकमंत्री आदित्य ठाकरे, रोहित पवार, शाहरुख खान, सचिन तेंडुलकर, सुभाष देसाई, विनोद तावडे, अभिनेत्री श्रद्धा कपूर, जावेद अख्तर, राजेश मापुसकर, शंकर महादेवन, महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल, विद्या बालन, रणबीर कपूर.

Udhav tribute

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.