लता दीदींचा सन्मान करण्यात महाराष्ट्राच्या आधी ‘या’ राज्याने मारली बाजी!

117

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांचे महाराष्ट्रात नुसते स्मारक उभारण्यावरून भाजप-शिवसेनेत वाद सुरू झाला आहे. स्मारकाच्या उभारणी मागणी कोणता पक्ष आधी करतो, यावर चढाओढ लागली. अशा परिस्थितीत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी मात्र दीदींच्या सन्मानार्थ लागलीच काही मोठ्या घोषणा करून महाराष्ट्राच्या आधी बाजी मारली आहे.

मध्य प्रदेश सरकारने लता दीदींना श्रद्धांजली अर्पण करत, त्यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण केले. यावेळी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी लता दीदींच्या नावे संगीत अकादमी, विद्यापीठ तसेच मध्य प्रदेश सरकार त्यांचा पुतळा उभारणार आहे. अशा अनेक महत्वाच्या घोषणा यांनी केल्या. यामुळेच लता दीदींचा सन्मान करण्यात महाराष्ट्राआधी मध्य प्रदेश राज्याने बाजी मारली आहे, हे दिसून येत आहे. दुसरीकडे मात्र शिवसेना नेते संजय राऊत दीदींचे स्मारकाचा विचार देशाने करावा, असे सांगत केंद्रावर जबाबदारी ढकलली आहे.

( हेही वाचा : शिवाजी पार्कात लता दीदींचे स्मृतीस्थळ उभारा! कुणी केली मागणी? जाणून घ्या… )

लता दीदींच्या नावे संगीत अकादमी

मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये लता मंगेशकर यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या नावाने संगीत अकादमी देखील स्थापन केली जाणार आहे, असे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात मुख्यमंत्री चौहान यांनी सांगितले की, लता दीदींचा जन्म इंदोरमध्ये झाला होता. त्यामुळे त्यांच्या नावाने इंदोरमध्ये संगीत अकादमी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या संगीत महाविद्यालयात विद्यार्थ्यांना त्यांच्या गाण्याचे शिक्षण दिले जाईल. एक संग्रहालय तयार करून आम्ही त्यात लता दीदींच्या सर्व गाण्यांचे संग्रह करणार असल्याचेही चौहान म्हणाले.

मुख्यमंत्री चौहान यांनी काय भावना व्यक्त केल्या?

लतादीदींच्या निधनाने वैयक्तिक नुकसान झाल्याची भावना करोडो भारतीयांची आहे. त्यांच्या गाण्यांनी आपल्या सर्वांच्या जीवनात नवा उत्साह आणि ऊर्जा संचारली आहे. लता दीदींच्या जाण्यामुळे माझ्या स्वतःच्या आयुष्यात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशा भावना शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केल्या. लता दीदी या फक्त संगीतापुरत्या मर्यादीत नव्हत्या. त्या एक सच्च्या देशभक्त होत्या. त्यांच्याकडून सर्वांना प्रेरणा मिळते भावी पिढीला देखील ही प्रेरणा मिळावी यासाठी लता दीदींचा पुतळा उभारण्यात येणार आहे, असेही चौहान यांनी सांगितले.

( हेही वाचा : ‘हे’ गाणं गाताना दिदी माईकसमोर ढसाढसा रडल्या होत्या… )

मध्य प्रदेश अग्रेसर

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पार्थिव देहावर छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (शिवाजी पार्क) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यानिमित्ताने भाजपचे आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून लता मंगेशकर यांचे स्मारक उभारण्याची मागणी केली. यावर संजय राऊत यांनी या मागणीची गरज नाही, यावरून राजकारण करू नका, त्यांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या भव्य स्मारकाचा विचार महाराष्ट्र व केंद्र सरकार करेल, असे राऊत यांनी स्पष्ट केले होते. महाराष्ट्रात अशा प्रकारचे राजकारण सुरू असतानाच, मध्य प्रदेश सरकारने मात्र लता दीदींचा सन्मान केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.