सिद्धार्थ शुक्लाने पाहिले होते मॅराडोना होण्याचे स्वप्न, पण…

मला कायमंच आपण मोठेपणी मॅराडोनाप्रमाणे फुटबॉलपटू व्हावे असे वाटायचे.

140

रुपेरी पडदा हा कितीही आकर्षक वाटत असला तरी छोट्या पडद्याने अनेक कलाकारांना मोठं केलं आहे. कारण छोट्या पडद्यामुळे कलाकार हा लोकांच्या घराघरात पोहोचतो आणि मनामनात जागा मिळवतो. असाच छोट्या पडद्यावरुन स्टार झालेल्या सिद्धार्थ शुक्लाचं हृदय विकाराच्या धक्क्याने कूपर रुग्णालयात निधन झाल्याने, त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याच्या नावाचा ट्रेंड सुरू झाला असून, त्याचे एक जुने ट्वीट सध्या समोर येत आहे. आपण मोठेपणी कोण होणार याबाबतचं स्वप्नरंजन लहानपणी प्रत्येकानेच केले आहे. तसंच एक स्वप्न सिद्धार्थनेही पाहिले होते. लहानपणी मॅराडोनाप्रमाणे फुटबॉलपटू होणे हे आपले स्वप्न होते, असे त्याने या ट्वीटमध्ये म्हटले आहे. पण अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर त्याचे हे स्वप्न चंदेरी लखलखाटात विरुन गेले.

मला मॅराडोना व्हायचे होते…

12 डिसेंबर 1980 साली मुंबईत जन्माला आलेला सिद्धार्थ पहिल्यापासूनच हरहुन्नरी होता. त्याने आपल्या करियरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी त्याचं पहिलं प्रेम होतं ते म्हणजे फुटबॉल. प्रसिद्ध फुटबॉलपटू मॅराडोनाचे नोव्हेंबर 2020 मध्ये निधन झाल्यानंतर सिद्धार्थने एक ट्वीट केले होते. फुटबॉल या खेळाची ओळख मला तुमच्यामुळे झाली. लहान असताना मला कायमंच आपण मोठेपणी मॅराडोनाप्रमाणे फुटबॉलपटू व्हावे असे वाटायचे, असे त्याने या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

चटका लाऊन जाणारी एक्झिट

सिद्धार्थने खूप कमी कालावधीत मोठी प्रसिद्धी मिळवली होती. आपल्या फिटनेसमुळे त्याची कायमंच तरुणींमध्ये क्रेझ होती. बिग बॉसच्या 13व्या सिझनचा सिद्धार्थ शुक्ला विजेता होता. त्यावेळी त्याने बिग बॉसच्या घरात खेळलेल्या उत्तम खेळाचेही अनेकांनी कौतुक केले होते. त्यामुळे त्याचे असे आकस्मिक जाणे हे सर्वांच्या मनाला चटका लाऊन गेले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.