भररस्त्यात वकीलावर जीवघेणा हल्ला, कायदा सुवस्थेचे धिंडवडे

याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, इतरांचा कसून शोध घेतला जात आहे.

दहिसरमध्ये भरदिवसा जमिनीच्या वादातून २० ते २५ जणांच्या एका टोळीने वकीलावर तलवार, सळई लाठ्याकाठयांनी हल्ला केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. भररस्त्यात झालेल्या या हल्ल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. भररस्त्यात भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे मुंबईत कायदा व सुवस्थेचे तीन तेरा वाजले असून, वकीलाच्या संघटनांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. याप्रकरणी एमएचबी पोलिसांनी २० ते २५ जणांविरुद्ध हत्येचा प्रयत्न, दंगल, हत्यारबंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, इतरांचा कसून शोध घेतला जात आहे.

असा केला हल्ला

सत्यदेव जोशी असे हल्ला करण्यात आलेल्या वकिलाचे नाव आहे. सत्यदेव जोशी हे रविवारी दुपारी दहिसर पश्चिम येथील कंदारपाडा, झेन गार्डन समोर असलेल्या जमिनीची पाहणी करण्यासाठी आपल्या अशिला सोबत निघाले होते. त्यादरम्यान १५ ते २० जणांची एक टोळी त्यांच्या दिशेने हातात नंग्या तलवारी, लोखंडी सळई, बांबू घेऊन आली. त्यापैकी काहींनी वकील सत्यदेव यांना धक्काबुक्की करत जमिनीची केस तू लढणार आहे, असे बोलून वकील सत्यदेव जोशी यांच्यावर तलवारी, सळई, बांबूने हल्ला करण्यास सुरुवात केली.

(हेही वाचाः पावसाचे धुमशान! मध्य रेल्वे विस्कळीत! सखल भागात साचले पाणी! कोकण रेल्वे ठप्प!)

तिघांना अटक

वकील जोशी यांनी मदतीसाठी आरडाओरडा करुन देखील शेकडोच्या संख्येने उभ्या असणाऱ्यांपैकी एकही जण मदतीसाठी घाबरुन पुढे आले नाही. तर अनेक जण या हल्ल्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करत होते. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले वकील सत्यदेव जोशी हे मृत झाल्याचे समजून, हल्लेखोर तेथून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच एमएचबी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी सत्यदेव जोशी यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करुन, १५ ते २० हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती परिमंडळ ११चे पोलिस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी दिली. तीन हल्लेखोरांना अटक करण्यात आली असून, इतर हल्लेखोरांचा कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती विशाल ठाकूर यांनी दिली.

काय म्हणाले जोशी?

याबाबत जखमी वकील सत्यदेव जोशी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी हा हल्ला जमिनीच्या वादातून करण्यात आला असल्याची शक्यता वर्तवली आहे. मी माझ्या अशिलासोबत वादग्रस्त जमीन बघण्यासाठी गेलो असता अचानक १५ ते २० जणांच्या जमावाने माझ्यावर तलवारी, लोखंडी सळई आणि बांबूने हल्ला केला, अशी माहिती जोशी यांनी दिली. मुंबईत या प्रकारे दिवसाढवळ्या भररस्त्यात हल्ले होऊ लागले आहेत, हल्लेखोरांना कायद्याची कुठलीही भीती राहिलेली नाही, मुंबईत कायदा सुवस्थेचे तीन तेरा वाजले असल्याचा आरोप काही वकील संघटनांनी केला आहे.

(हेही वाचाः कसारा घाटात कोसळली दरड !)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here