रात्री शाळेत हजेरी लावली, सकाळी वनविभागाने बिबट्याची रवानगी पिंज-यात केली

177

जून महिन्यात शाळा सुरु झाल्यानंतर गोरेगावातील बिंबिसार नगरातील पालिका शाळेत मध्यरात्री साडेबारा वाजता बिबट्या शिरला. शाळेत शिरताना बिबट्याला सुरक्षारक्षकाने पाहिले. बिबट्याच्या धास्तीने अखेर वनविभागाला बोलावले गेले. शाळेत गेलेल्या बिबट्याला अखेर तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर वनविभागाने सुखरुप बाहेर काढले.

गोरेगावातील बिबिंसार नगरातील पालिकेच्या शाळेत बिबट्या शिरल्याची माहिती मिळताच ठाणे प्रादेशिक वनविभाग आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची वन्यप्राणी बचाव टीम पावणेतीनच्या सुमारास पोहोचली. घटनेची माहिती मिळताच वनमजूरांनी संपूर्ण टीम येण्याअगोदर घटनास्थळी धाव घेत संपूर्ण जागेची पहाणी केली. बिबट्या शाळेतील स्वच्छतागृहात लपल्याचे वनमजूरांच्या पाहणीत लक्षात आले. बिबट्याला बाहेर जायचा मार्ग सापडत नसल्याने बिबट्या वर्गात जाण्याऐवजी स्वच्छतागृहातच अडकून राहिला. बिबिंसार हा परिसर पश्चिम द्रूतगती मार्गापासून १०० मीटर अंतरावर असल्याने पकडताना बिबट्या पळून गेल्यास मोठा गोंधळ होण्याची शक्यता होती. घटनास्थळी वनविभागाची संपूर्ण टीम पोहोचल्यानंतर बिबट्यााला बेशुद्ध करुन पकडण्याचा निर्णय झाला. एव्हाना बिबट्या शाळेत आल्याची बातमी वेगाने पसरली होती. बघ्यांची गर्दी आवरण्यासाठी वनविभागाला पोलिसांनी साहाय्य केले. वनविभागाला मदत करण्यासाठी वाईल्डलाईफ वेल्फेअर असोसिएशन आणि रेसकिंग असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर या प्राणीप्रेमी संस्थाही घटनास्थळी पोहोचल्या.

(हेही वाचा – Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर उरले आता ‘हे’ दोनच पर्याय)

स्वच्छतागृहातील खिडकीतूनच बिबट्याला बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन बंदुकीच्या माध्यमातून दिले गेले. टीम घटनास्थळी पोहोचल्यानंतर तब्बल तीन तासानंतर सकाळी सहा वाजता बिबट्याला जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले. बिबट्याची रवानगी तातडीने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पशुवैद्यकीय रुग्णालयात केली गेली. बिबट्याला पकडल्यानंतर वनविभाग त्याच्या शरीरात मायक्रोचीप टाकतात. बिबिंसार येथून पकडलेल्या बिबट्याला अगोदरही पकडले आहे का, याची माहिती त्याच्या शरीरात मायक्रॉचीप आढळून आली बिबट्या याअगोदरही पकडला होता की नाही, याची माहिती वनविभागाला मिळेल. बिबट्याची शारिरीक तपासणी केल्यानंतर त्याला पुन्हा जंगलात सोडण्याचा निर्णय वनविभागाकडून घेतला जाईल. बिबट्याच्या बचावाचे कार्य ठाणे प्रादेशिक वनविभागाचे उपवनसंरक्षक संतोष सस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक वनसंरक्षक गिरीजा देसाई, मुंबई वनविभागाची बिबट्या बचाव टीम, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची बचाव टीम, तसेच ठाण्याचे मानद वन्यजीव रक्षक रोहित मोहिते आणि पवन शर्मा यांच्या सहकार्याने पार पडली.

बाहेर पडण्याचा बिबट्याचा प्रयत्न फसला

स्वच्छतागृहात अडकल्याचे लक्षात येताच बिबट्याने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. स्वच्छतागृहाला लागून असलेल्या रिकाम्या जागेतून उडी मारत बिबट्या स्वच्छतागृहात शिरला होता. ही जागा वनविभागाने जाळी लावून बंद केली. परिणामी, बिबट्याला पुन्हा स्वच्छतागृहाबाहेर जाता आले नाही. बिबट्या स्वच्छतागृहातच अडकून पडला. त्यानंतर वन्यप्राणी बचाव पथकातील सदस्याने बंदूकीच्या माध्यमातून बिबट्याला बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन दिले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.