गोरेगावात पकडलेल्या बिबट्याची ओळख पटली

गोरेगावातील बिंबीसार परिसरातील पालिकेच्या शाळेत शिरलेल्या बिबट्याची ओळख पटल्याची माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे वनसंरक्षक व संचालक जी मल्लिकार्जून यांनी दिली. या बिबट्याला जेरबंद केल्यानतंर शारिरीक तपासणीत मायक्रोचीप आढळली. जेरबंद केलेला बिबट्या दोन वर्षांपूर्वी येऊर परिसरातून वनविभागाच्या बिबट्या बचाव पथकाने पकडल्याची माहिती मल्लिकार्जून यांनी दिली.

बुधवारी सकाळी शाळा सुरु होण्याअगोदरच आदल्या दिवशी मध्यरात्री पालिकेच्या बिंबिसार परिसरात बिबट्या शिरला होता. या बिबट्याला वनविभागाच्या ठाणे प्रादेशिक वनविभाग आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वन्यप्राणी बचाव पथकाच्या टीमने यशस्वीरित्या जेरबंद केले. साधारतः तीन ते चार वर्षांचा नर बिबट्या असून त्याच्या शरीरावर तपासणीअंती कोणत्याही जखमा आढळून आल्या नाहीत, अशी माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे वन्यप्राणी बचाव पथकाचे प्रमुख विजय बारब्दे यांनी दिली.

बिबट्याची शारिरीक तपासणी पूर्ण झाली आहे. बिबट्याच्या शरीरावर कोणत्याही जखमा आढळलेल्या नाही. निर्णयानंतर बिबट्याला नैसर्गिक अधिवासात पुन्हा सोडले जाईल वन्यप्राणी बचाव पथक प्रमुख, विजय बारब्दे

डिसेंबर २०२० साली या बिबट्याला आम्ही येऊर येथील जंगलातून पकडले होते. येऊरच्या आदिवासी पाड्याजवळ बिबट्या दिसून येत असल्याची आम्हांला तक्रार मिळाली होती. आम्ही घटनास्थळी भेट दिली. बिबट्या आम्हांला जागेवरच दिसून आला. साधारणतः वर्षभराच्या बिबट्याचे हे बछडे फारच अशक्त होते. परिणामी, त्याला चार पावलेही व्यवस्थित चालता येत नव्हती. बछड्याजवळ आईदेखील आढळून आली नाही. परिणामी, त्याला तातडीने पकडून आम्ही उपचार सुरु केले. तापाने फणफणणा-या बिबट्याच्या बछड्याला तीन दिवसांच्या यशस्वी उपचारानंतर सोडून देण्यात आले, अशी माहिती बारब्दे यांनी दिली. दोन वर्षानंतर तीन ते चार वर्षांचा येऊरमध्ये पकडलेला बिबट्याच बिंबिसारमध्ये शिरल्याचे तपासणीअंती वनाधिका-यांना समजले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here