भाईंदर येथील उत्तन भागांत केशवसृष्टी भागांत गेल्या अकरा दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होऊ लागले आहे. केशवसृष्टीत राहणा-या कर्मचा-यांच्या घराबाहेरील झाडांवर राहणा-या कोंबड्या अचानक गायब झाल्यानंतर रात्री आणि भल्या पहाटे आता बिबट्याचे अधूनमधून दर्शन होऊ लागले आहे. या भागांतील दाट वनराईत वसलेल्या केशवसृष्टीनजीकच्या शाळेच्या परिसरातही बिबट्या भल्या पहाटे दिसून येत असल्याने सकाळी मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालक घाबरले आहेत.
( हेही वाचा : वाडिया हॉस्पिटलच्या शस्त्रक्रियागृहाला आग )
याआधीही बिरसामुंडा पाडा येथे मार्च महिन्यांत पहिल्यांदा बिबट्याचे दर्शन झाले होते. वनविभागानच्या कॅमेरा ट्रेपनंतर साधारणतः तीन वर्षांची मादी बिबट्या भाईंदर भागांत फिरत असल्याचे दिसले. काही दिवसानंतर बिबट्या गायब झाला. त्यानंतर जुलै महिन्याच्या अखेरिस बिबट्या दिसला. या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. बिबट्या सतत दिसत नसल्याने तसेच अद्याप त्याने माणसावर हल्ला केला नसल्याने आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे. बिबट्याचा वावर असलेल्या क्षेत्रात आवश्यक काळजी घेण्याचे आवाहनही वनविभाग आणि सर्प ही प्राणीप्रेमी संस्था संबंधित भागांत करत आहे.
बिबट्याचा वावर असलेल्या क्षेत्रात काय काळजी घ्याल
० बिबट्या निशाचर प्राणी आहे. बिबट्याच्या वावर असलेल्या क्षेत्रात सायंकाळनंतर बाहेर पडू नका. भल्या पहाटेपर्यंत बिबट्याचा वावर राहतो. त्यामुळे यावेळीही घराबाहेर जाणे टाळा.
० बिबट्या कुत्रे, कोंबड्या भक्ष्य म्हणून पसंत करतो. त्यासाठी तो मानवी वस्तीजवळ येतो. रात्रीच्यावेळी घरात पाळलेले कुत्रे आणि कोंबड्या घराबाहेर ठेवू नका.
० डोळ्याला समांतर दिसणारे आपले भक्ष्य असल्याचा समज करुन कित्येकदा बिबट्या माणसावर हल्ला करतो. त्यामुळे रात्री किंवा भल्या पहाटे जंगलात किंवा बिबट्याचा वावर असलेल्या भागांत घराबाहेर प्रातःविधीसाठी जाऊ नका.
० काही अपरिहार्य कारणास्तव रात्री किंवा सकाळी घराबाहेर जायचे असल्यास गर्दीसह घराबाहेर पडा. जोरजोरात बोलत किंवा मोबाईलवर गाणे लावत चालत रहा. यावेळी हातात टॉर्चही असू द्या.
० बिबट्याचा वावर असलेल्या नागरी वसाहतीतील रस्त्यावर दिव्यांची पुरेशी सोय असावी. तसेच प्रसाधनगृहांचीही सोय असावी
० बिबट्याचा वावर असलेल्या ठिकाणी कच-याची विल्हेवाट लावली जावी. जेणेकरुन कुत्र्यांचा वावर वाढणार नाही. कुत्रा हे बिबट्याचे आवडते आणि सहज मिळणारे भक्ष्य आहे.
० बिबट्याचा वावर वाढत असल्यास खबरदारीचा उपाय म्हणून वनविभागाच्या १९२६ या हेल्पलाईन क्रमांकाला फोन करा.
Join Our WhatsApp Community