लग्नाची वरात सोडून गावकऱ्यांनी कासवाची शिकार करणाऱ्यांना बदडले

89

नंदूरबार जिल्ह्यातील शहादा जिल्ह्यात प्रामुख्याने स्थानिक आदिवासी जमात राहते. निसर्गाशी मिळतेजुळते राहण्यासाठी वन्यप्राणी आणि पक्ष्यांना आपलेसे समजणा-या गावक-यांनी थेट वरात सोडून शिकाऱ्यांना बेदम मारल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. कटाहूळ गावातील धरणात कासव पकडणा-यांना पाहून लग्नाची वरात सोडून धरणाकडे धाव घेत गावकऱ्यांनी दहा कासवांना मरणातून वाचवले.

( हेही वाचा : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर! १ जुलै पासून पगारवाढ होणार? )

शहादा जिल्ह्यातील कटाहूळ गावात लग्नाची वरात वाजत गाजत लग्नमंडपाच्या दिशेने जात होती. मात्र गावक-यांना वाटेतील धरणाजवळ अनोळखी माणसांच्या हालचाली दिसल्या. धरणातील कासव पकडले जात असल्याचे दिसताच गावक-यांनी शिका-यांना ताब्यात घेतले. धरणात सॉफ्ट शेल टर्टल प्रजातीच्या कासवांना शिकारी पकडत होते. गावक-यांची गर्दी पाहून शिका-यांनी घाबरुन जाळ्यात पकडलेले सहा कासव पुन्हा धरणात सोडून दिले. शिका-यांच्या ताब्यातील चार सॉफ्ट शेल टर्टल कासवांना गावत-यांनी ताब्यात घेत चारही शिका-यांवर चांगलीच हातसफाई केली. याबाबत गस्तीवरील वनविभागाला गावक-यांनी तक्रार देत चारही आरोपी वनाधिका-यांच्या ताब्यात दिले.

सॉफ्ट शेल टर्टलचा वापर तेल बनवण्यासाठी

गुजरातच्या खेडा तालुक्यातून जडीबुटी विकण्यासाठी चार शिकारी नंदुरबारला आले होते. कासवांच्या पाठीच्या कवचाचा वापर करुन तेल बनवल्यास माणसांच्या शरीरावरील दुखणी कमी होतात, यासाठी धरणातील कासव पकडण्यासाठी चारही शिकारी गेले होते. वनाधिका-यांना दिलेल्या माहितीत, चारही आरोपी पहिल्यांदाच नंदुरबारला आले होते. कासव पकडून मारण्याचा चारही शिका-यांचा पहिला प्रयत्न होता. मात्र गावक-यांच्या सतर्कतेमुळे सॉफ्ट शेल टर्टल कासवांचा जीव वाचला.

New Project 12 7

पाच दिवसांच्या वनकोठडीत दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न मिटला

सचिन मलमकवाना, अरुणमलमकवाना, अजय मलमकवाना, लखा मलमकवाना असे गुजरातहून जडीबुटी विकण्यासाठी आलेल्या शिका-यांची नावे आहेत. गुजरातला तैयबपुरा येथे राहणा-या चारही शिका-यांचा जडीबुटी विकणे हा कौटुंबिक व्यवसाय आहे. दिवसाच्या मिळकतीवरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. या समूहातील बायका घरोघरी जाऊन भिक्षा मागून कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. जेवणाची भ्रांत असल्याने पाच दिवसांच्या वनकोठडीत पोटाची खळगी भागत असल्याची प्रतिक्रिया मात्र वनाधिका-यांच्या मनाला चटका लावून गेली.

कारवाई पथक –

नंदूरबार वनविभागातील साहाय्यक वनसंरक्षक एस.डी. साळुंखे, शहादा विभागातील वनपरिक्षेत्र अधिकारी एस.पी.मेंढे, डी.बी.जमदाळे, डी.ए.पाटोळे, एस.एम.पाटील, बी.एल.राजपूत, जे.यू.पवार,बी.वाय.पिंजारी, एस.एच.राठोड, एस.जी.मुकाडे, डी.एस.परदेशी, नईम मिर्झा, संजय वाघ, नंदूरबार वनविभागाचे मानद वन्यजीव रक्षक सागर निकुंभे

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.