विधीमंडळ अधिवेशन प्रत्यक्ष, मग महापालिका सभागृह का नको?

जर व्हीसीद्वारे अर्थसंकल्पावर भाषण करायचे असेल, तर आपण करणार नाही, अशी भूमिका विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी घेतली आहे.

विधीमंडळाचे अधिवेशन एका बाजुला प्रत्यक्ष उपस्थितीत पार पाडले जात असतानाच दुसरीकडे मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव पुढे करत महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापालिकेची अर्थसंकल्पीय चर्चा व्हिडीओ कॉन्फरन्सीद्वारेच घेण्याचा निर्णय लादत नगरसेवकांच्या अधिकारावर गदा आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे ठाकरे सरकारला विधीमंडळ प्रत्यक्ष चालते, मग महापालिकेचे सभागृह प्रत्यक्ष का नको?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे अजब ठाकरे सरकार, असे म्हणण्याची वेळी नगरसेवकांवर आली आहे.

व्हिडीओ कॉन्फरन्सीद्वारेच ही अर्थसंकल्पीय चर्चा होणार!

मुंबई महापालिकेचे सन २०२१-२२चा अर्थसंकल्प स्थायी समितीत मंजूर करण्यात आल्यानंतर मागील ४ मार्च रोजी ते महापालिका सभागृहात मांडण्यात आले. स्थायी समितीने ६५० कोटी रुपयांच्या निधीच्या अंतर्गत विकासकामांच्या सूचनेसह तो मंजूर करण्यात आला. त्यामुळे सभागृहापुढे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी अर्थसंकल्प मांडल्यानंतर आता या अर्थसंकल्पीय चर्चेला सुरुवात होत आहे. त्यामुळे येत्या ९ मार्च रोजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांचे भाषण पार पडल्यानंतर पुढील आठवड्यात या चर्चेला सुरुवात होईल. मागील एक वर्षात कोविडमुळे महापालिकेचे सभागृह होवू शकले नाही. तसेच कोविडमुळे सन २०२०-२१च्या अर्थसंकल्पावरही नगरसेवकांना चर्चा करता आलेली नव्हती. परंतु कोविडच्या नावाखाली व्हिडीओ कॉन्फरन्सीद्वारेच ही अर्थसंकल्पीय चर्चा केली जाणार असल्याने नगरसेवकांना केवळ आपली भाषणे वाचून दाखवावीच लागणार आहे. जर ऐकणारेच नसेल, तर भाषण कुणासाठी करायचे असे बोलले जाते. त्यामुळे नगरसेवकांमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सीद्वारे होणाऱ्या या चर्चेला जोरदार विरोध होत आहे.

(हेही वाचा : आमदारांना ‘लाइव्ह’ धमकी… भाजपचा विधानसभेत हल्लाबोल!)

विरोधी पक्षनेत्यांचा बहिष्कार!

आजवर कोविडमुळे आपण सभागृहाचे कामकाज व्हीसीद्वारे घेत असला तरी किमान अर्थसंकल्पीय चर्चा तरी प्रत्यक्ष सभेद्वारे घ्यावी, अशी मागणी नगरसेवकांकडून केली जात आहे. खुद्द विरोधी पक्षनेते रवी राजा आता अडून बसले आहे. जर व्हीसीद्वारे भाषण करायचे असेल, तर आपण करणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतल्याचे समजते. मात्र, हीच भूमिका सर्व नगरसेवकांची आहे. अर्थसंकल्प सादर करायचे असल्याने स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना व्हीसीवरून आपले भाषण करावे लागले, हा अपवाद असला तरी इतर नगरसेवक मात्र याला तयार नाही. त्यामुळे ठाकरे सरकारला आता यावर निर्णय घ्यावाच लागणार असून स्वत: इक्कबालसिंह चहल आणि महापौर किशोरी पेडणेकर काय भूमिका घेतात यावर अर्थसंकल्पीय चर्चेचे भविष्य अवलंबून असल्याचे दिसून येते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here