धुळे येथील शिंदखेडा तालुक्यात हतनूर गावात बिबट्याला तीन माणसांनी काठीने मारल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या बिबट्याने तीन माणसांवर हल्ला केला त्यावेळी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तीन जणांनी बिबट्याला काठीने मारल्याचे बोलले जात आहे. या तीन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे वनाधिका-यांना त्यांचा जवाब नोंदवता आला नाही. हा प्रकार धुळ्यात पहिल्यांदाच घडल्याचे बोलले जात आहे.
सोमवारी दुपारी हतनूर येथील शेतावर हा प्रकार घडला. अंदाजे दोन ते तीन वर्षांच्या बिबट्याचा मृतदेह शेतात आढळून आला. या घटनेत साहेबराव पाटील, संदीप पाटील तसेच जितेंद्र पाटील या तीन जणांना बिबट्याच्या हल्ल्यात जखमा झाल्या. ही माहिती गावक-यांकडून वनाधिका-यांना समजली. वनाधिका-यांनी घटनास्थळी भेट घेतली तोपर्यंत तिन्ही लोकांना गावक-यांनी रुग्णालयात दाखल केले होते. वनाधिका-यांनी बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला. रुग्णालयात तीन जणांचा जबाव नोंदवण्यासाठी वनाधिका-यांनी भेट दिली. मात्र जखमेमुळे डॉक्टरांनी वनाधिका-यांना रुग्णाशी बोलण्यास मनाई केली. शवविच्छेदन अहवाल प्रलंबित असल्याने या संपूर्ण प्रकरणाबाबत अद्यापही निश्चितपणे बोलता येणार नाही. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु आहे. मात्र या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार नसल्याची माहिती धुळे वनविभाग (प्रादेशिक)चे उपवनसंरक्षक नितीन सिंग यांनी दिली.
( हेही वाचा: अवयव दानापासून सरकारी रुग्णालयांची फारकत; जाणून घ्या कारण… )