आरेतला ‘तो’ बिबट्या तिसऱ्यांदा पिंजऱ्यात अडकला

आरेत दिवाळीच्या पहिल्याच दिवशी दीड वर्षांच्या मुलीवर हल्ला केलेल्या बिबट्याला ओळखण्याची ओळख परेड अजूनही सुरु आहे. या हल्ल्यानंतर 30 ऑक्टोबर रोजी बिबट्याला जेरबंद करण्यात आले. जून महिन्याच्या अखेरच्या दिवसांत गोरेगाव येथील बिंबीसार परिसरातील शाळेत आलेला बिबट्या वनाधिकाऱ्यांच्या पिंजऱ्यात पुन्हा अडकला. आतापर्यंत हा बिबट्या तीनवेळा जेरबंद झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

पहिल्यांदा पिंजऱ्यात अडकला कारण…

अंदाजे चार वर्षांचा हा बिबट्या, त्याला सर्वात पहिल्यांदा ठाण्यातील येऊर येथील जंगलातून वनाधिकाऱ्यांनी पकडले होते. लहान वयातच अशक्तपणा आल्याने तो येऊर मध्ये एकाच जागी निपचित पडून होता. अखेरीस त्याला वनाधिकाऱ्यांनी पकडून उपचारासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पशुवैद्यकीय रुग्णालयात आणले. बिबट्यावर यशस्वी उपचारानंतर त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

दुसऱ्यांदा शाळा आवडली

जून महिन्यात गोरेगाव येथील बिंबीसार येथे मध्यरात्री हा बिबट्या शिरला. शाळेतील बाथरूममध्ये तो अडकला. बाथरूमजवळील उघड्या जागेवरून हा बाहेर पडणार तेवढ्यातच तिथे जाळी लावली गेली आणि बिबट्या बाथरूममध्येच अडकला. अखेरीस त्याला बेशुद्ध करून वनाधिकाऱ्यांनी जेरबंद केले.

साथीदारासोबत असताना पिंजऱ्यात अडकला

आरेत लहान मुलीवर हल्ला करणारी मादी बिबट्या असून, दोन मादी बिबट्यांची ओळख पटवण्यासाठी वनाधिकाऱ्यांनी बराच वेळ घेतला. त्यात दोन नर बिबटे वनाधिकाऱ्यांच्या पिंजऱ्यात अडकले. बिंबीसारच्या शाळेत गेलेला बिबट्या 30 ऑक्टोबर रोजी पिंजऱ्यात अडकला. त्यावेळी तो आरेत आपल्या साथीदारासोबत होता. ही साथीदार सी57 असून, तिलाच वनाधिकारी शोधत आहेत.

तिसऱ्या हल्ल्यानंतर पहिल्या बिबट्याला सोडले

दीड वर्षांच्या मुलीवर हल्ला झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी पकडलेल्या बिबट्याला दोन आठवड्यानंतर सोमवारी सोडण्यात आले. रविवारी पुन्हा हल्ला झाल्यानंतर वनविभागाने दोन आठवड्यापासून जेरबंद केलेल्या बिबट्याला सोडण्याचा निर्णय घेतला. या सी 55 बिबट्याला आरेतून 26 ऑक्टोबर रोजी पकडण्यात आले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here