फिल्मसिटीत संशयास्पदरित्या आढळून आलेल्या बिबट्याच्या बछड्याच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण

रविवारी सकाळी फिल्मसिटीत संशयास्पदरित्या आढळून आलेल्या बिबट्याच्या बछड्याच्या मृत्यूप्रकरणाला नवे वळण आले आहे. बिबट्या झाडावरून पडून मेला असावा असा अंदाज बांधणाऱ्या वनविभागाला, अंतिम शवविच्छेदन अहवालात बछड्याला न्यूमोनियाची लागण झाल्याचे दिसून आले. मात्र मांजरकुळातील प्राणी झाडावरून सहसा पडत नाही, डोक्याला इजाही होत नाही. हा घातपाताचाच प्रकार असल्याची मोठी चर्चा रंगली आहे.

नेमके प्रकरण काय?

गोरेगाव येथील फिल्मसिटी परिसरात रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास नऊ महिन्यांच्या नर बिबट्याचा मृतदेह आढळून आला. चन्नामेरिया या मालिकेच्या सेटजवळ बिबट्याच्या बछड्याचा मृतदेह आढळला. रस्त्यापासून शंभर मीटर अंतरावर बछड्याचा मृतदेह स्थानिकांनी पाहिला आणि वनविभागाला कळवले.
वनविभागाने घटनास्थळी धाव घेत, बिबट्याच्या बछड्याचा मृतदेह ताब्यात घेतला. मृत्यूचे कारण जाणून घेण्यासाठी मृतदेह तातडीने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पाठवला गेला. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात बिबट्याच्या डोक्याला जखम झाल्याचे दिसून आले. बछड्याला श्वसनाचा त्रास होत होता, बछडा अशक्त होता. डोक्याला रक्तस्त्राव झाल्याने बछड्याचा मृत्यू झाल्याची माहिती प्राथमिक शवविच्छेदन अहवालात दिली गेली. या अहवालाच्या आधारावर बछडा झाडावरून पडला असावा, अशी माहिती ठाणे प्रादेशिक वनविभागाच्या सहाय्यक वनसंरक्षक गिरीजा देसाई यांनी दिली.

अंतिम शवविच्छेदन अहवाल 

अंतिम शवविच्छेदन अहवाल मंगळवारी सायंकाळी वनविभागाला मिळाला. या अहवालात बिबट्याच्या बछड्याला न्यूमोनियाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. बिबट्या अशक्त होता, त्याने काही खाल्लेदेखील नव्हते, अशी माहिती देसाई यांनी दिली.

प्रत्यक्षदर्शीचे मत 

बिबट्याच्या बछड्याचा मृतदेह प्रत्यक्षात पाहिलेल्या वन्यप्रेमीच्या दाव्यानुसार, हा घातपात आहे. चन्नामेरियाच्या सेटवर बिबट्या येत असल्याची तक्रार वनविभागाला होती. याआधीही दुसऱ्या हिंदी मालिकेच्या सेटजवळ बिबट्या येत असल्याची जून महिन्यात वनविभागाला तक्रार होती. रविवारच्या घटनेत बिबट्याच्या तोंडातून आणि नाकातून रक्तस्त्राव होत होता. बिबट्याला काठीने मारले गेल्याचा दावा वन्यजीव प्रेमींनी केला. मात्र अंतिम शवविच्छेदन अहवालाच्या आधारावर बिबट्याला डोक्यात काठी घातली असावी या आरोपाचे देसाई यांनी खंडन केले. चन्नामेरिया मालिकेच्या सेटवरील माणसांची चौकशीही केल्याचे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here