रक्तदान करत बिबट्याने वाचवले आपल्या साथीदाराचे प्राण

शरीरात हिमोग्लोबिन कमी झाल्याने बिबटयाने दुसऱ्या बिबटयाला रक्तदान करून नवे जीवनदान दिल्याची घटना पुण्यात घडली. पुण्यातील रेस्क्यू या प्राणीप्रेमी संघटनेकडे उपचार घेणाऱ्या दोन बिबट्याच्या बछडयांपैकी एकाने दुसऱ्याला रक्तदान करत मरणाच्या दारात पोहोचलेल्या बिबटयाच्या बछड्याचा जीव वाचवला. याआधीही रेस्क्यू या संस्थेत उपचार घेणाऱ्या बिबट्याला संस्थेतील दुसऱ्या बिबटयाकडून रक्तदान करण्यात आले आहे.
अवैधरित्या पिंजऱ्यात डांबून ठेवलेल्या बिबटयाच्या बछड्याची वनाधिकाऱ्यांनी सुटका केली होती. या बिबटयाला उपचारासाठी पुण्यातील रेस्क्यू या प्राणीप्रेमी संस्थेकडे वनाधिकाऱ्यांनी सोपवले. उपचारादरम्यान बछड्याच्या शरीरात रक्तामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण फारच कमी असल्याचे पशु्वैद्यकीय अधिकाऱ्यांना आढळले. परिणामी, बछड्याला दुसऱ्या बछड्याचे रक्तदान करण्याचा निर्णय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घेतला. याकरिता वनविभागाची रीतसर परवानगीही त्यांनी घेतली. रक्तदान केल्यानंतर बिबटयाचा जीव वाचल्याची माहिती संस्थेच्या प्रमुख नेहा पंचमिया यांनी ट्विटर या सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. मात्र अधिक माहितीसाठी त्यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here