…आणि बिबट्याने घरातूनच धूम ठोकली

142

सांगली येथील वाळवा येथील बाळासाहेब हजारे यांच्या रात्री ऐन जेवणाच्या वेळेला अचानक अनोळखी पाहुणा आला. घरात सर्व सदस्य असताना अचानक घरात बिबट्या आला. प्रसंगावधानता दाखवत हजारे यांनी घरातल्यांची सुखरूप सुटका केली आणि बिबट्याला घरात बंदिस्त केले. गेल्या आठवड्यात सातारा जिल्ह्यातही अशीच घटना दिसून आली होती. दोन्ही घटनामध्ये भक्ष्याच्या पाठी लागून बिबट्या घरात शिरला होता. या दोन्ही घटनामधून बिबट्या भक्ष्याच्या पाठी लागून मानवी वस्तीजवळ येत असल्याचे दिसून आले. त्यामुळे बिबट्याचा अधिवास क्षेत्रातील मानवी वस्तीतील पाळीव प्राणी सायंकाळनंतर घराबाहेर ठेवू नका, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

(हेही वाचा – MSRTC: एसटी महामंडळाचे ‘ते’ 118 कर्मचारी पुन्हा सेवेत रुजू)

काय घडली नेमकी घटना

मांजराचा पाठलग करत बिबट्या हजारे यांच्या घरात घुसून थेट स्वयंपाक घरात शिरला. बाळासाहेब हजारे यांनी हा अचानक आलेल्या पाहुण्याला पाहून अगोदर स्वयंपाक घराचा दरवाजा बंद करून घेतला. घरातल्या सर्व सदस्यांना त्यांनी घराबाहेर काढले. या घटनेची माहिती मिळताच वनाधिकाऱ्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी घटनास्थळी जमलेल्या सर्व ग्रामस्थांना सूचना देऊन सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी विनंती केली. बिबट्या साधारणतः वर्षभराचा असावा हे हजारे यांच्या बोलण्यातून लक्षात आले. घरात प्रवेश केल्यानंतर अतिशय नियोजनपर पद्धतीने वनाधिकाऱ्यांनी स्वयंपाक घराचा दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच बिबट्या आल्या पावली परत गेला. बिबट्याने धूम ठोकल्याचे पाहताच गावकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

कारवाईतील पथक

सांगली वनविभाग (प्रादेशिक)च्या उपवनसंरक्षक नीता कट्टे आणि सहाय्यक वनसंरक्षक अजित साजणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. या कारवाईत शिराळ्याचे वनक्षेत्रपाल सचिन जाधव, इस्लामपूरचे वनपाल सुरेश चरापले , वनरक्षक रायना पाटोळे , अक्षय शिंदे , वनसेवक शहाजी पाटील, वन सेवक अनिल पाटील व प्राणी मित्र युनूस मनेर यांनी सहभाग नोंदवला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.