विरार येथील काशिद गावात मार्चमध्ये पकडलेल्या बिबट्याला संसर्गामुळे आपला एक पाय गमवावा लागला. या बिबट्याला बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्या पुनर्वसन केंद्रात कायमचे राहावे लागणार आहे. परंतु या बिबट्याला वन्यप्राणी दत्तक पुनर्वसन योजनेतून वन्यप्राणी संस्था दत्तक घेणार आहे.
काही काळ आरामाची गरज
विरार येथून वनविभागाने पकडलेल्या अपंग बिबट्याला दत्तक घेण्याचा अर्ज सर्प या प्राणीप्रेमी संस्थेने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडे दिला आहे. या बिबट्याच्या समोरच्या डाव्या पायाला संसर्ग झाला होता. पाच सहा वर्षांच्या नर बिबट्याला गँगरीनच्या संसर्गापासून वाचवण्यासाठी पूर्ण पायच शस्त्रक्रियेच्या माध्यमातून पशुवैद्यकीयांच्या टीमने काढला. सध्या हा बिबट्याला टायगर सफारीतील जागेत ठेवण्यात आले आहे. त्याच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असली तरीही त्याला काही काळ आरामाची गरज आहे, अशी माहिती उद्यानाचे लायन व टायगर सफारीचे वनपरिक्षेत्रपाल विजय बारब्धे यांनी दिली. मात्र लोखंडी सळी एका पायातून काढताना झालेल्या संसर्गातून वाचवण्यासाठी त्याचा पाय काढावा लागल्याने तो बिबट्या उद्यानातील पुनर्वसन केंद्रात कायमचा राहणार असल्याचे ते म्हणाले.
( हेही वाचा : ठाणे- कल्याण रेल्वेच्या पाचव्या, सहाव्या मार्गाचा उपयोग काय? )
उद्यानात गेल्या नऊ वर्षांपासून दत्तक प्राणी योजना सुरु आहे. या योजनेच्या माध्यमातून उद्यानातील पिंज-यातील वन्यप्राणी वर्षभरासाठी दत्तक घेता येतात. त्यांचा पालनपोषणाचा खर्च उचलता येतो. उद्यान प्रशासनाने त्याचे नाव विरु असे ठेवले आहे. बिबट्या दत्तक योजनेतून वर्षभरासाठी पालनपोषणासाठी मिळत असल्याने सर्प या प्राणीप्रेमी संस्था दत्तक घेण्यासाठी इच्छुक आहे. याबाबत अंतिम निर्णय लवकरच घेतला जाईल, असे बारब्धे म्हणाले.
Join Our WhatsApp Community