भाईंदर पश्चिम येथील चौपाटी रोड नजीकच्या लोकल ट्रेन कारशेड परिसरातील मच्छी मार्केटची बुधवारची सकाळ वेगळीच झाली. गेल्या तीन दिवसांपासून परिसरात एका अनपेक्षित पाहुण्याची चाहूल सकाळी स्थानिकांना प्रत्यक्षात समोरच दिसली. एका बंद व धूळीत पडलेल्या गाडीत चक्क बिबट्या आपले सावज खाताना स्थानिकांना दिसला, एरव्ही या भागांत बिबट्या आढळल्याचा ऐकिवात नसताना बिबट्या चक्क डोळ्यांसमोर नाश्ता करत असल्याचे पाहत स्थानिकांना चांगलीच धडकी भरली.
डोळ्यांसमोर बिबट्या पाहून माणसाची किंचाळी ऐकून बिबट्याही घाबरला आणि त्याने थेट गटारात उडी मारत लपण्याचा प्रयत्न केला. ही माहिती वनविभागाच्या हेल्पलाईनवर मिळताच मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. परंतु तोपर्यंत बघ्यांची गर्दी जमली होती. माणसांची गर्दी बघून बिबट्याही घाबरला, तोपर्यंत गर्दीला आवरण्यात पोलिस तसेच अग्नीशमन दलाला यश आले होते. हे चित्र स्थानिक पहिल्यांदाच अनुभवत होते. साहजिकच या थराराची भीती आणि उत्सुकताही स्थानिकांमध्ये होती.
बिबट्याच्या सुटकेचे पाच तास
सांडपाण्यात अडकून पडलेल्या बिबट्याला बाहेर पळून जायला वाव मिळू नये, यासाठी सांडपाण्याच्या दोन्ही बाजू बंद केल्या गेल्या. त्यानंतर बिबट्याला बेशुद्ध करुन पकडण्याचा निर्णय घेतला गेला. बिबट्याला बेशुद्ध करायला वनाधिका-यांना अक्षरशः जमिनीवर झोपावे लागले. सांडपाण्याच्या बाजूलाच असलेल्या कठड्यावर जागा निश्चित करुन वनाधिका-याने बिबट्याला बंदुकीच्या माध्यमातून बेशुद्ध केले. बिबट्या गाढ झोपेत गेल्याची खात्री मिळताच त्याला बाहेर काढून बचाव पथकाने थेट संजय गांधी राष्ट्रीय उद्यान गाठले. बिबट्या बचावाची कार्यवाही पाच तासानंतर दुपारी चार वाजून २५ मिनिटांनी संपली आणि स्थानिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
(हेही वाचा अरे बापरे… राज्यात आता बिबट्या पकडायला ‘ही’ शिकारी जमात!)
गुरुवारी होणार पशुवैद्यकीय चाचणी
रात्री नऊच्या आसपास बिबट्याला जाग आल्यानंतर त्याला उद्यानातील वनाधिका-यांनी खायला दिले. रात्रीही बिबट्या ग्लानीतच होता, अशी माहिती उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांनी दिली. गुरुवारी बिबट्याची वैद्यकीय चाचणी केली जाईल, बिबट्याच्या शरीरावर कुठेही जखमा आढळून आल्या नाहीत, असेही डॉ. पेठे यांनी स्पष्ट केले.
ज्या भागांतून बिबट्या पकडला गेला तिथून अगदी हाकेच्या अंतरावर कांदळवन आहे. या घनदाट भागांतून बिबट्या रहिवासी क्षेत्रात आला असावा. दोन दिवसांपासून बिबट्या दिसत असल्याची तक्रार आल्यानंतर आम्ही तातडीने ट्रॅप कॅमेरे बसवले. बिबट्या परिसरात येत असल्याचे टॅप कॅमे-याच्या माध्यमातून स्पष्ट झाले. तातडीने जनजागृती करण्यासही आम्ही सुरुवात केली.
– विजय बारब्धे, बचाव पथक प्रमुख, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली
उत्तनमध्येही सहा महिन्यांपूर्वी बिबट्या आला होता?
भाईंदरमधील उत्तन भागांतही सहा महिन्यांपूर्वी बिबट्या प्रत्यक्षात पाहिल्याचे स्थानिक सांगतात. बिबट्याच्या पाऊलखुणाही वनाधिका-यांना आढळल्या होत्या. मात्र कॅमेरा ट्रॅपमध्ये बिबट्या आढळून आला नव्हता, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.
अन्य शक्यता
बिबट्या अगोदरपासूनच केवळ कांदळवन परिसरापुरता फिरत असावा. परंतु मच्छी मार्केटमधील मासळीत वावरणा-या पाळीव प्राण्यांना खायला बिबट्याने या परिसरात तीन दिवसांपासून फिरायला सुरुवात केली असावी. बिबट्या सांडपाण्याच्या जलवाहिनीतूनही प्रवास करु शकतो. त्यामुळे सांडपाण्याच्या जलवाहिनीतून या परिसरात बिबट्या आल्यानंतर भक्ष्य सहज मिळत असल्याने त्याने तीन दिवसांचा पाहुणचार घेतला असण्याची शक्यता वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केली.
बिबट्या आढळल्यास काय करावे?
- बिबट्याच्या अधिवासात क्षेत्रात शक्यतो रात्रीचा संचार करु नये. गरज असल्यास एकटे बाहेर न जाता ग्रुपने बाहेर जावे.
- माणसांच्या घोळक्यात जाताना परिसरात जोरजोरात बोलत जावे. मोबाईलवर गाणी लावावी.
- बिबट्याचे आवडते भक्ष्य हा कुत्रा असल्याचे वनविभागाच्या याआधीच्या सर्वेक्षणात आढळून आले आहे.
- परिसरात स्वच्छता ठेवावी. कच-याचे व्यवस्थापन ठेवावे. कच-याचा ढिगारा वाढल्यास कुत्र्यांची संख्या वाढते. कुत्र्यांना खायला बिबट्या येतो.
- परिसरात लाईट्स पुरेशा असाव्यात. तसेच प्रसाधनगृहांची व्यवस्था असावी.
- घरातील कत्रे, मांजर तसेच प्रांगणातील गायी रात्री बाहेर ठेवू नयेत.
- वन्यप्राणी आढळल्यास १९२६ या वनविभागाच्या हेल्पलाईनवर फोन करुन माहिती द्यावी.
- वन्यजीव थेट हाताळल्यास वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत गुन्ह्याची नोंद वनविभाग करु शकते.
(हेही वाचा बिबट्यानं घेतली बारा बंगल्यांची हजेरी! अखेर 7 तासांनी बिबट्या जेरबंद)
Join Our WhatsApp Community