हाताची वाकलेली बोटं, बोटांवर दिसणारे खवले, पायांची बोटंही वाकलेली … हातापायाला आलेली विद्रूपता पाहून आजही कित्येक कुष्ठरोगी समाजापासून विभक्त आयुष्य जगत आहेत, त्यांना समजून घेण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यायला हवा. शालेय पुस्तकांतही कुष्ठरोग्यांना सामावून घेण्यासाठी जनजागृतीपर धडे असायला हवे, असे मत जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने इंडियन असोसिएशन ऑफ लेप्रोलॉजिस्टकडून व्यक्त करण्यात आली आहे. ३ डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने असोसिएशनकडून चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी चर्चासत्रात सहभागी तज्ज्ञांनी हे मत मांडले.
कुष्ठरोगाच्या रुग्णांमध्ये घट
गेल्या तीन वर्षांत कुष्ठरोगाच्या रुग्णांमध्ये कमालीची घट होतेय. त्यांना शोधून त्वरित उपचार सुरु करणं हे आव्हान आमच्यासमोर असतं, असं मत इंडियन असोसिएशन ऑफ लेप्रोलॉजिस्टचे अध्यक्ष डॉ. नरसिंह राव यांनी व्यक्त केले आहे. मात्र जनजागृतीसाठीही भर दिला जावा, असेही ते म्हणाले. असोसिएशनच्या समन्वयक डॉ. किरण कटोज यांनीही वेळीच उपचारावर भर देण्याचा मुद्दा मांडला. शस्त्रक्रियेच्या माध्यमातूनही उपचार करुन रुग्ण वेळीच बरा होतो. आज चांगल्या दर्जाची औषधही कुष्ठरोगावरील उपचारांसाठी उपलब्ध आहेत. शारीरिक उपचारांप्रमाणेच त्यांना मानसिक उपचारांचीही गरज लागते. त्यामुळे कुष्ठरोग्यांना समाजाने स्विकारण्याची मानसिकता तयार होण्यासाठी शालेय पुस्तकांतही जनजागृती करायला हवी, असेही डॉ. किरज कटोज म्हणाले. कुष्ठरोगांवर होणा-या मानसिक अपघातावर तपशीलवार अभ्यास हवा, असा मुद्दा बॉम्बे लेप्रसी प्रकल्पाचे संचालक डॉ. व्ही. पै यांनी मांडला.
( हेही वाचा : राज्यातील किमान तापमानात किंचित वाढ! )
मानसिक आधाराची गरज
देशात सुमारे ३ दशलक्ष कुष्ठरोगी आहेत. त्यांना मानसिक आधाराची तसेच उपचारांची गरज आहे. या रुग्णांना उपचारांत होणारा आर्थिक ताण, तसेच मानसिक परिणाम यावर अद्यापही पुरेशी माहिती जमा झालेली नाही. या माहितीवर काम करायला हवं, असे बॉम्बे लेप्रसी प्रोजेक्टचे प्रकल्प संचालक डॉ व्ही. पै यांनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community