मुंबईतील वाढत्या आगीच्यासाठी घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकांना अग्निसुरक्षेची माहिती दिली जात असतानाच आता महापालिका शाळांमधील मुलांनाही अग्निसुरक्षेचे धडे दिले जाणार आहे. आगींच्या दुघर्टनांनंतर नागरिकांना सुरक्षा उपाययोजनांची माहिती दिली जाते, त्याच धर्तीवर महापालिका शाळांमधील मुलांनाही अशाप्रकारचे सुरक्षेचे धडे दिले जाणार आहे. यासाठी प्रत्येक अग्निशमन केंद्रांवर मुलांना नेले जाणार आहे. ज्याद्वारे त्यांना अग्निशमन दलाचे काम कसे चालते याची माहिती दिली जाणार आहे. याबरोबरच उद्यानांमध्येही भेटी देवून शाळकरी मुलांना उद्यान विषयक कामांचीही माहिती दिली जाणार आहे.
( हेही वाचा : राष्ट्रपतींनी केले सतर्क! म्हणाले, ‘कोरोना संपलेला नही; दक्ष रहा’ )
झाडे लावण्याकडे कल
मुंबई महापालिकेच्यावतीने शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्याप्रकारच्या अभ्यासाचे धडे दिले जातात. त्यामुळे आजवर ब्रिटीश कौन्सिल तसेच बॉम्बे स्टॉक एक्सेंज आदींच्या माध्यमातून अनुक्रमे इंग्रजी भाषेसह व्यवहाराचे धडे दिले जात आहे. मात्र, भविष्यात मुलांमध्ये अग्नि सुरक्षेचे धडे देणे आवश्यक असून अग्निशमन दल हे महापालिकेचे असल्याने मुंबईतील सर्व अग्निशमन केंद्रांवर मुलांच्या भेटी आयोजित करून अग्निशमन दलाच्या जवानांच्यावतीने कशाप्रकारे आगप्रतिबंधक उपाययोजना राबवली जाते आणि कशाप्रकारे अशा आगी लागल्या तर आपण कशी काळजी घेतली जावी याची माहिती मुलांना दिली जाणार असल्याचे समजते.
मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी महापालिका शाळांमधील मुलांना कार्यानुभवच्या तासांमध्ये अग्निसुरक्षा आणि उद्यान विषयक कामांची माहिती देण्याचा विचार असल्याचे सांगितले. महापालिकेचे स्वत:ची उद्याने असून त्यामध्ये वेगवेगळ्याप्रकारची उद्याने विकसित केलेली आहे. त्यामध्ये वेगवेगळ्याप्रकारची झाडे लावण्यात आलेली आहे. यामध्ये कोणती झाडे लावली जावी तसेच झाडांच्या बिया कशा ओळखाव्या आदींची माहिती देवून त्यांचा कल झाडे लावण्याकडे वाढवला जाईल. पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून मुलांना उद्यान विषयक कामांची माहिती देण्याचा विचार आहे.
शिवाय अग्निसुरक्षेची माहिती देणे ही काळाची गरज असल्याने भावी पिढीला याचे ज्ञान व्हावे म्हणून शाळांमधून अशाप्रकारचे अग्निश सुरक्षेचे धडे देण्याचाही विचार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community