शाळेची फी न भरल्याने विद्यार्थ्यांना ठेवले डांबून; शाळेविरोधात गुन्हा दाखल

106

वाघोली येथील लेक्सिकॉन इंटरनॅशनल स्कूल येथे शिकणा-या काही विद्यार्थ्यांनी फी भरली नसल्याने विद्यार्थ्यांना शाळा सुटल्यानंतर डांबून ठेवल्याप्रकरणी पालकांनी व मनसे पदाधिकारी यांनी शाळेविरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. संबंधितांवर खंडणी व अपहरणाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी मात्र पालकांचा गैरसमज झाल्याचे सांगितले आहे.

 मिळालेल्या माहितीनुसार, वाघोली येथील लेक्सिकॉन इंटरनॅशनल स्कूलमध्ये बुधवारी (ता. १८) दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांची घरी जाण्यासाठी सुट्टी झाल्यानंतर काही मुलांना शाळेतच ठेवून पालकांना फी भरण्यासंदर्भात सांगण्यात आले. फी भरा आणि मुलांना घेऊन जा असे शाळेकडून सांगण्यात आल्याचे काही पालकांनी सांगितले. फी न भरलेल्या विद्यार्थ्यांचे पालक धावत पळत शाळेत आले आणि शाळेने केलेल्या प्रकाराबाबत विचारणा केली.

( हेही वाचा: ‘या’ प्रकरणात विश्वास नांगरे पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिका-यांची होणार चौकशी )

खंडणी, अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

त्याचवेळी मनसे पदाधिकारी व पालक यांनी एकत्रित शाळेच्या मुख्याध्यापकांना तीव्र शब्दांत जाब विचारला. पालकांचा रोष पाहता लोणीकंद पोलिसांनादेखील यावेळी बोलावण्यात आले. काही पालक मुलांना घेण्यासाठी वर्गावर गेले असता, त्यांना मुलांना भेटू दिले जात नसल्याचा आरोपही करण्यात आला. पोलिसांच्या मध्यस्तीने वातावरण निवळण्याचा प्रयत्न केला गेला. यानंतर मुलांना पालकांच्या हवाली करण्यात आले. परंतु संतप्त पालक व मनसे पदाधिका-यांनी शाळेच्या विरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात मुलांना डांबून ठेवल्याची लेखी तक्रार दाखल करून खंडणी, अपहरणाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. या प्रकाराबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांना  पालकांनी खडे बोल सुनावले. पालकांचा गैरसमज झाला असल्याचे सांगून गोंधळात न बोलता प्रत्येक पालकाशी वैयक्तिकरित्या भेटून बोलणार असल्याचे मुख्याध्यापकांनी यावेळी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.