कोविड काळात मुंबई महानगर पालिकासह राज्यातील इतर महापालिकेकडून वैद्यकीय सामुग्री तसेच डॉक्टर, नर्स पुरवठा बाबत काढण्यात आलेल्या निविदेचा भंग करून कंत्राट मिळवणाऱ्या एका मॅनेजमेंट सर्व्हिसेस फर्मसह पाच जणांविरुद्ध आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मे.लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस फर्म, डॉ. हेमंत राणा, सुजित पाटकर, संजय शहा आणि राजू साळुंखे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या फर्मसह पाच जणांची नावे आहेत. फसवणूक, बोगस दस्तावेज तयार करणे, निष्काळजीपणे मृत्यूस कारणीभूत या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, यातील आरोपी सुजित पाटकर हे शिवसेना नेते संजय राऊत यांचे व्यवसायिक भागीदार आहेत. कोविड काळात मुंबईसह राज्यातील रुग्णालय तसेच जम्बो कोविड सेंटर यांना वैद्यकीय सामुग्री तसेच मनुष्यबळ पुरवण्यासाठी महानगर पालिकेकडून कंत्राटे देण्यासाठी निविदा काढण्यात आल्या होत्या.
मे. लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस या फर्मचे भागीदार असलेले सुजित पाटकर यांच्यासह इतरांना वैद्यकीय क्षेत्रातील कुठलाही अनुभव नसताना बनावट दस्तवेजांच्याआधारे मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण नवीमुंबई येथील रुग्णालय तसेच जम्बो कोविड सेंटरला वैद्यकीय सेवा पुरवण्याचे कंत्राट मिळवून शासनाची फसवणूक करून जम्बो कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या नागरिकांच्या जीवाशी खेळून काहींच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. तसेच शासनाची ३८ कोटींची फसवणूक करून अपहार केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
सोमय्या यांनी याबाबत आवाज उचलून या कंपनी आणि त्यांच्या भागीदाराविरुद्ध तक्रार अर्ज दाखल केले होते. तसेच न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मुंबई महानगर पालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी सोमय्या यांनी एक तक्रार अर्ज आझाद मैदान पोलीस ठाण्यात केला होता. याप्रकरणी मंगळवारी आझाद मैदान पोलिसांनी किरीट सोमय्या यांच्या तक्रार अर्जावरून मे.लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस फर्म, डॉ. हेमंत राणा, सुजित पाटकर, संजय शहा आणि राजू साळुंखे यांच्याविरुद्ध भा.द.वी कलम ४२०, ४०६,४६५,४६७,४६८,४७१,३०४(अ ) सह कलम ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community