स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक निर्मित स्वातंत्र्यवीर हा भव्य लाईट अँड साऊंड शो पावसाळ्यानंतर आता पुन्हा सुरू होत आहे. ‘स्वातंत्र्यवीर’ हा शो स्मारकासाठी नव्हे तर साऱ्या देशासाठीच एक मानबिंदू आहे. वॉलमॅपिंग तंत्रज्ञानावर आधारित हा भारतातील पहिला कायमस्वरूपी आणि व्यक्तिचित्रणात्मक असा ‘लाईट अँड साऊंड शो’ आहे.
( हेही वाचा : IND VS BAN : विराट कामगिरी! बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात कोहलीने मोडला ‘हा’ रेकॉर्ड)
कसा आहे ‘लाईट अँड साऊंड शो’
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या दर्शनी भागात 66 फूट x 94 फूट भिंतीवर हा कार्यक्रम दाखविला जातो. यासाठीचा प्रोजेक्टर 27 फूट उंचीवरील एका मनोऱ्यात ठेवण्यात आला आहे. प्रेक्षकांना बसण्यासाठी तात्पुरती गॅलरी उभारण्यात आली असून एका वेळेला 150 प्रेक्षक हा कार्यक्रम बघू शकतात. स्वातंत्र्यवीर सावरकर प्रखर राष्ट्राभिमानी, क्रांतीकारक, संवेदनशील कवी, लेखक होतेच पण द्रष्टेही होते आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे पुरस्कर्तेही होते. त्यामुळे त्यांच्यावरील कलाकृती साकारताना कला आणि तंत्रज्ञानाचा संगम असणे अत्यावश्यक होते.
रात्री आठ वाजता हा शो सुरू होतो. तत्पूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा भव्य पुतळा, त्याच्या दोन्ही बाजूला असलेली १८५७ च्या स्वातंत्र्य समरापासून स्वातंत्र्यापर्यंतच्या काल खंडावरील भित्तिशिल्पे पाहता येतील. अंदमानच्या सेल्युलर जेलची प्रतिकृती तसेच सर्वच क्रांतिकारकांना ज्या यमयातना भोगाव्या लागल्या त्याचे स्मरण करून देणारा कोलू, विविध प्रकारच्या बेड्याही पाहता येतील.
सावरकरांचे क्रांतिकार्य तरुण पिढीपर्यंत पोहचविणारी नेत्रदीपक कलाकृती
‘स्वातंत्र्यवीर’ या लाईट अँड साऊंडची शो ची संकल्पना आणि दिग्दर्शन, ‘लोकमान्य- एक युगपुरुष’ या अप्रतिम चित्रपटाचे तरुण दिग्दर्शक ओम राऊत यांची आहे. तर स्मारकाच्या या अतिशय आगळ्यावेगळ्या, महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आणि मंजिरी मराठे यांनी पेलली आहे. हा भव्य लाईट अँड साऊंड शो म्हणजे सावरकरांचे क्रांतिकार्य तरुण पिढीपर्यंत पोहोचविणारी एक आधुनिक आणि नेत्रदीपक कलाकृती आहे.
सावरकरांच्या आभासी प्रतिकृतीला वास्तविकतेची झालर येण्यासाठी कमालीचे व्हिज्युअल आणि साऊंड इफेक्ट्स दिले गेल्याने प्रेक्षकांसाठी हा शो नेत्रदीपक पर्वणी ठरतो. या शोच्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील काही घटना आणि वीर सावरकरांचा जीवनपट उलगडण्यास मदत होते.
‘लाईट अँड साऊंड शो’विषयीच्या काही निवडक प्रतिक्रिया
‘स्वातंत्र्यवीर’ हा शो आंतरराष्ट्रीय दर्जाचा असून स्वातंत्र्यवीरांच्या नावाला शोभेल अशा प्रकारचा हा भव्य कार्यक्रम देशाच्या प्रत्येक नागरिकांनी पाहणे आवश्यक आहे.
– राज ठाकरे, मनसे अध्यक्षभारतामध्ये मी अशा प्रकारचा दृकश्राव्य कार्यक्रम पाहिलेला नाही. हा कार्यक्रम वीर सावरकरांपर्यंत पोहचण्याचा एक रस्ता आहे. मला खात्री आहे हा कार्यक्रम बघून सावरकरांचे चरित्र वाचल्याशिवाय चैन पडणार नाही. सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन.
– सुबोध सुरेश भावे, अभिनेतास्वातंत्र्यवीर सावरकरांचे प्रेरणादायी कार्य सर्व जनतेपर्यंत व पुढच्या पिढीपर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पोहोचवत असल्याबद्दल अभिनंदन! देशात पहिला थ्रीडी साऊंड आणि लाईट अँड साऊंड शो केल्याबद्दल मला अभिमान वाटत आहे. आपल्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा!
-राहूल शेवाळे, खासदार
कधी, कुठे पाहता येणार 3D मॅपिंग ध्वनी प्रकाश शो?
- स्थळ : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर
- वेळ : रात्री 8.00 (दर शनिवार आणि रविवार)
- कालावधी : 40 मिनिटे
- प्रवेश : विनामूल्य