नोव्हेंबर महिन्याच्या अखेरिस गुजरातच्या सक्करबाग प्राणिसंग्रहालयातून आशियाई प्रजातीच्या सिंहाची जोडी बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणली गेली. या सिंह-सिंहिणीला मंगळवारी ६ नोव्हेंबरला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत पिंज-यातून पहिल्यांदाच बाहेर काढले जाणार आहे. एकीकडे सात वर्षांपासून सिंह सफारीचे कामकाज सुरु असताना विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाले की नाही, कामकाज पूर्ण झालेले नसल्यास सफारीतील सिंह पर्यायी पिंज-यात सोडले जाणार आहेत का, याबाबत उद्यान प्रशासनाने स्पष्टता दिलेली नाही. या सिंहांना भारतीय स्टेट बॅंकेने दत्तक घेतले आहे.
( हेही वाचा : वर्षाखेरीस होणार कोरोनाचा अंत? राज्यात बारा जिल्हे कोरोनामुक्त)
केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या सूचनेनुसार, सिंहाच्या सफारीसाठी अद्यायावत व अतिरिक्त जागा आवश्यक असल्याने जानेवारी २०१५ साली सिंह सफारी बंद करण्यात आली. बराच काळ सफारी बसमधून पर्यटकांना दिसणारे सिंह पर्यायी पिंज-यातून दाखवण्यात येत होते. आता तब्बल सात वर्षांनी सिंह सफारी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत सुरु होणार आहे. डी११ आणि डी २२ अशी या दोन वर्षांच्या सिंह आणि सिंहिणीची नावे आहेत. या सिंहांचा जन्मच सक्करबाग प्राणिसंग्रहालयात झाला. त्यांनी आयुष्यात कधीच प्रवास केला नव्हता. दोघांनाही वनाधिका-यांनी गुजराहून मुंबईत आणले. दोन्ही सिंह मुंबईतील वातावरणात समरस झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच प्रत्येक सिंहामागे वर्षाला तीन लाख रुपये मोजत भारतीय स्टेट बँकेने अल्पावधीतच सिंहाना दत्तक घेतले आहे. वन्यप्राणी दत्तक योजनेनुसार, प्राण्यांना वर्षभरासाठी दत्तक घेतल्यानंतर त्यांच्या आहाराचा खर्च उचलला जातो. तसेच आठवड्यातून एकदा त्यांना पिंज-यात पाहण्याची परवानगी मिळते.
Join Our WhatsApp Community