रेल्वेची ‘ती’ चेन, ‘इतक्या’ महाभागांना पडली महागात

151

‘संकटाच्या वेळी गाडी उभी करण्यासाठी साखळी ओढावी, विनाकारण साखळी ओढल्यास १ हजार रुपये दंड अथवा एक वर्षापर्यंत कैद होऊ शकते’, ही सूचना प्रत्येक ट्रेन, मेल-एक्सप्रेसमध्ये आपत्कालीन साखळी शेजारी लिहिलेली असते, तरी देखील विनाकारण साखळी ओढणाऱ्यांची संख्या कमी नाही. पश्चिम रेल्वे मागील अकरा महिन्यांत ३,२३८ गुन्हे दाखल करून १,३६१ जणांना अटक करण्यात आली आहे. विनाकारण साखळी ओढल्यामुळे ट्रेनचे वेळापत्रक कोलमडून इतर प्रवाशांना त्याचा त्रास होत असल्याचे रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

गंमत म्हणून ओढली जाते साखळी

ट्रेन, मेल एक्सप्रेसमध्ये प्रवास करतांना संकटाच्या वेळी गाडी थांबवण्यासाठी रेल्वेकडून प्रत्येक डब्यात सीट जवळ एक साखळी ठेवलेली असते. संकटाच्या वेळी ही साखळी ओढली की, त्याची सूचना मोटरमन आणि गार्ड यांना मिळते, काही तरी संकट ओढवले म्हणून ट्रेन थांबवली जाते. अनेक वेळा गंमत म्हणून काही प्रवासी विनाकारण साखळी ओढतात. गाडी थांबल्यानंतर गाडीतील गार्ड आणि सुरक्षा रक्षक कुठल्या बोगीतून साखळी ओढली गेली, याचा शोध घेतात. विनाकारण साखळी ओढल्यामुळे ट्रेनला उशीर होऊन रेल्वेचे वेळापत्रक कोलमडते. त्यात प्रवाशांना देखील त्रास सहन करावा लागतो.

(हेही वाचा परमबीर सिंहांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा! 11 जानेवारीला पुढील सुनावणी)

किती गुन्हे दाखल?

विनाकारण साखळी ओढणाऱ्यांवर रेल्वे प्रशासनाकडून दखल घेऊन रेल्वे कायदा अंतर्गत कारवाई करण्यात येते, रेल्वे कायदा १४४ अंतर्गत ही कारवाई करून त्या प्रवशाला रेल्वे न्यायालयात हजर केले जाते. न्यायालयात त्याच्यावर दंडात्मक कारवाई अथवा काही महिन्यांचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा एकत्र करण्यात येते. जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०२१ या अकरा महिन्यांत पश्चिम रेल्वेकडून विनाकारण साखळी ओढणाल्या प्रकरणी ३,२३८ गुन्हे दाखल केले असून १,३६१ जणांना याप्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. गेल्या वर्षी म्हणजे २०२० मध्ये हा आकडा १,८०२ इतका होता व ६९२ जणांना अटक करण्यात आली होती. गेल्यावर्षी कोविडचा काळ असल्यामुळे ही आकडेवारी कमी झाली असल्याचे रेल्वे अधिकरी यांचे म्हणणे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.