पवईच्या सायकल ट्रॅकजवळून जातोय बिबट्याचा संचारमार्ग

192

पवई तलाव ते विहार तलावापापर्यंत सायकल ट्रॅक सुरु करण्याच्या सरकारी योजनेला स्थानिकांचा कडाडून विरोध होत असताना या सहा किलोमीटरचा रस्ता जंगलमार्गातून जात असल्याने बिबट्याच्या संचारमार्गाला बाधा पोहोचेल, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली. केवळ पर्यटनापोटी हा सायकल ट्रॅक उभारु नका, या प्रकल्पामुळे मानव-बिबट्या संघर्ष भविष्यात नव्या संकटाची नांदी ठरेल, असा सावध इशारा पर्यावरवादी कार्यकर्ते आणि स्थानिकांनी दिला आहे.

बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबटे गेल्या कित्येक वर्षांपासून पवई पाईपलाईनवरुन भांडूप आणि पवईत येजा करत आहेत. बिबट्याचा या जंगलमार्गातून जाणा-या संचारमार्गाबाबत पवईवासीय तसेच वनविभागालाही कल्पना आहे. या संचारमार्गाला लागूनच सायकल ट्रॅकची उभारणी होत आहे. आतापर्यंत या संचारमर्गात बिबट्याने कोणत्याही माणसावर हल्ला केल्याची नोंद नाही. निशाचर आणि माणसापासून दूर राहणे पसंत करणा-या बिबट्याच्या संचारमार्गात माणसाचा हस्तक्षेप होत आहे. त्यामुळे भविष्यात या सायकल ट्रॅकवर बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडू शकतात, अशी भीती स्थानिक व्यक्त करत आहेत.

(हेही वाचा –मुंबईत खासगी रुग्णालयात आढळला म्युकरमायकोसिसचा रुग्ण)

पवईतील आयआयटी या शैक्षणिक संस्थेतही बिबटयाच्या संचाराच्या नोंदी आहेत. बिबट्याने आयआयटीला येण्यासाठी पवई पाईपलाईनचाच मार्ग निवडला होता. त्यामुळे सायकल ट्रॅक प्रकल्प रद्द करा, अशी मागणी स्थानिक रहिवासी, पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते व स्थानिक आदिवासींनीही केली आहे.

पर्यावरण मंत्र्यांची भेट हवी आहे

प्रकल्पाबाबत सरकारकडून कोणतीच पारदर्शकता नाही. प्रकल्पाचे काम थेट सुरु झाले. याबाबतची माहिती नागरिकांना उपलब्ध नाही. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या भेटीसाठी समन्वयकाकडून जुहू येथे बोलावण्यात आले. मात्र सायकल ट्रॅकबाबत भूमिका मांडणा-या गटात ज्येष्ठांचाही समावेश असल्याने आम्ही बैठक पवईत घेण्याची विनंती केली. पर्यावरणमंत्र्यांनी एकादोघांना भेटण्याऐवजी किमान ५० जणांचे कळकळीचे म्हणणे निदान ऐकून घ्यावे. पवईत भेट शक्य नसेल तर आभासी बैठकीचे नियोजन करावे, असे पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते सुशांत बळी यांनी म्हटले आहे.

पवई तलाव स्वच्छ करा

आम्हा स्थानिकांना पवईतलावापासून सुमारे सहा किलोमीटर तयार होणारा सायकल ट्रॅक नको आहे. हा पैसा खर्च करण्याऐवजी पवई तलावाचे सुशोभिकरण करावे तसेच पवईतील वाढत्या जलप्रदूषणाविषयी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखाव्यात. मी स्वतः या ट्रॅकच्या मार्गावर सहा किलोमीटर चालत गेले आहे. हा मार्ग सायकल ट्रॅकला अपेक्षित जागेपेक्षा विस्तारित आहे. आम्हां पवईवासीयांना पवई तलाव वाचवायचा आहे – पेमेला, स्थानिक रहिवासी व ज्येष्ठ नागरिक

आदिवासींचा रोजगार बुडेल

सायकल ट्रॅकच्या सुरुवातीला मगरी अंडी घालतात. ती जागा नष्ट झाल्यास मगरींच्या अधिवासाला धोका आहे. सायकल ट्रॅकच्या जागेवर दिवसभर गर्दुल्ले असतात. त्यामुळे सायकल ट्रॅक उभारल्यानंतर घातपातीची शक्यता नाकारता येत नाही. आम्ही पवई तलावात मासेमारी करुन उपजीविका करतो. आमच्या व्यवसायावर गदा येईल, असे मनोज नावाच्या स्थानिक
आदिवासी व्यक्तीने सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.