राज्यात ब्रेक दि चेन अंतर्गत सुरू असलेला लॉकडाऊन उठणार का? अशी चर्चा सुरू असताना राज्यातला लॉकडाऊन वाढवण्यात येणार, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात सरसकट लॉकडाऊन हटवला जाणार नाही, मात्र निर्बंध काही प्रमाणात शिथील होतील, असे टोपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. राज्य मंत्रिमंडळाची बैठक गुरुवारी पार पडली त्यानंतर टोपे बोलत होते.
काय म्हणाले नेमकं टोपे?
सरसकट लॉकडाऊन उठवण्याबाबत निर्णय झाला नसल्याची माहितीही राजेश टोपे यांनी दिली. सध्या आहे त्या निर्बंधांमध्ये काही ठिकाणी शिथीलता आणण्याचा विचार झाला असल्याचे, ते म्हणाले. या संदर्भातली नियमावली येत्या दोन दिवसांत जाहीर होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत लॉकडाऊन लगेच उठवणे शक्य होऊ शकणार नाही, यावर सर्व मंत्र्यांचे एकमत झाल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.
(हेही वाचाः …तर जून महिनाही लॉकडाऊनमध्ये जाणार!)
पदोन्नती आरक्षणाबाबत निर्णय नाही
राज्याच्या टास्क फोर्सशी चर्चा करुन निर्बंधांच्या शिथीलतेबद्दल निर्णय घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. गुरुवारी झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत तौक्ते वादळासह पदोन्नती आरक्षणावरही चर्चा झाली. मात्र, या आरक्षणाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे राजेश टोपे यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community