मुंबईत भरदिवसा एका कार्यालयात घुसलेल्या पाच दरोडेखोरांच्या टोळीने शस्त्राच्या धाक दाखवून ७७ लाख रुपयांची लूट केल्याची घटना मुलुंड पश्चिमेत घडली. या घटनेने पूर्व उपनगरात एकच खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
४ ते ५ दरोडेखोरांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल
मुलुंड पश्चिम येथील पाच रस्ता या ठिकाणी एका जुन्या इमारतीच्या तळ मजल्यावर व्ही. पटेल फार्म नावाने अंगाडीया सर्व्हिसेस हे कार्यालय आहे. बुधवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास टुरिस्ट मोटारीतून आलेल्या पाच शस्त्रधारी दरोडेखोरांनी कार्यालयात प्रवेश केला आणि कार्यालयात असलेल्या कर्मचारी यांना दोघांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवून कार्यालयात असलेली ७७ लाखांची रोकड बळजबरीने घेऊन पोबारा केला. या दरोड्याची माहिती मिळताच मुलुंड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळावर असलेले सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन ४ ते ५ दरोडेखोरांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला. या दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन पथके तयार करण्यात आली असून दरोडेखोरांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्राथमिक चौकशीत दरोडेखोरांनी ७७ लाख रुपयांची रोकड पळवल्याचे समोर येत असून या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे मुलुंड पोलिसांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community