स्पर्धक म्हणून मॅरेथॉनमध्ये गेले आणि केली चोरी

95

मुंबईत अथवा इतर शहरामध्ये होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या स्पर्धकांच्या वाहनातील वस्तू चोरणाऱ्या दाम्पत्यासह तिघांना मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ७ च्या पथकाने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या मुख्य चोराविरुद्ध १००पेक्षा अधिक गुन्ह्याची नोंद असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष ७ चे प्रभारी पोलीस निरीक्षक मनीष श्रीधनकर यांनी दिली आहे.

लाखो रुपयांचा ऐवज चोरीला

जुनैद युनूस शेख (३२), हाफिजा जुनैद शेख (३०) आणि रहिस खान (४५) असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. जुनैद हा सराईत चोर असून त्याची पत्नी हाफीजा ही चोरीचा माल विकण्यासाठी त्याला मदत करते, तर रहीस हा जुनैदला चोरी करण्यासाठी मदत करतो. विक्रोळी पूर्व या ठिकाणी महिन्याभरापूर्वी पार्क करण्यात आलेल्या मोटारीच्या काचा फोडून मोटारीतून लाखो रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखा कक्ष ७ च्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज च्या माध्यमातून चोरांचा शोध सुरू केला होता.
दरम्यान यातील मुख्य आरोपी जुनैद हा घाटकोपर पंतनगर येथील बेस्ट आगार या ठिकाणी येणार असल्याची माहिती कक्ष ७च्या अधिकारी यांना मिळाली.

(हेही वाचा : कारवाईचे सत्र सुरूच! एसटी संपात आणखी ५४२ कर्मचाऱ्यांचे निलंबन )

मुंबईसह राज्यभरात १०० पेक्षा अधिक गुन्हे

पोलिसांनी सापळा लावून जुनैद शेख याला अटक करून त्याच्याकडे कसून चौकशी सुरू केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत आपल्या सहकार्याची नावे सांगितली. गुन्हे शाखेने हाफीजा शेख आणि रहीस खान या दोघांना अटक करून त्यांच्याकडून मॅरेथॉन मध्ये वापरले जाणारे टॉवेल, पोलीस मॅरेथॉन टॉवेल, तलवार, वाहनांच्या चाव्या आणि इतर मालमत्ता जप्त करण्यात आली. अधिक चौकशीत ही टोळी ज्या शहरात मॅरेथॉन असेल त्या ठिकाणी स्पर्धक बनून जात होते व पार्क करण्यात आलेल्या स्पर्धकांच्या मोटारीच्या काचा तोडून आतील सर्व सामान चोरी करून पोबारा करीत होती. या टोळीने मुंबईसह राज्यभरात १००पेक्षा अधिक गुन्हे केले असून, प्रथमच हे आरोपी पोलिसांच्या हाती लागले असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.