लम्पी आजार : मुंबईत २२०३ गायींचे लसीकरण

मुंबईत ३ हजार २२६ गोजातीय जनावरे व २४ हजार ३८८ म्हैस-वर्गीय जनावरे असून निर्धारित प्राधान्यक्रमानुसार यापैकी गोजातीय जनावरांचे लम्पी प्रतिबंधासाठी लसीकरण करण्यात येत आहे. यानुसार आतापर्यंत २ हजार २०३ गोजातीय जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. उर्वरित गोजातीय जनावरांचे लसीकरण पुढील आठवड्यात होईल, अशी माहिती पशुवैद्यकीय आरोग्य खात्याचे प्रमुख तथा देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. कलीमपाशा पठाण यांनी दिली आहे.

प्रामुख्याने गोजातीय व म्हैस-वर्गीय जनावरांमध्ये लम्पी या विषाणूच्या प्रादुर्भावाची संभाव्यता लक्षात घेऊन राज्य शासनाने निर्गमित केलेल्या अधिसुचनेनुसार मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे मुंबईत विविध स्तरिय उपाययोजना सातत्याने करण्यात येत आहेत. या उपाययोजना मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. इ. सिं. चहल आणि अतिरिक्त आयुक्त (शहर) आशीष शर्मा यांच्या मार्गदर्शनानुसार आणि उप आयुक्त (विशेष) संजोग कबरे यांच्या सुचनांनुसार पशुवैद्यकीय आरोग्य खात्याद्वारे राबविण्यात येत आहेत.

याबाबत अधिक माहिती देताना पठाण यांनी सांगितले की, लम्पी साथरोगाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील गोजातीय व म्हैस-वर्गीय जनावरांचे सर्वेक्षण यापूर्वीच सुरु करण्यात आले आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेच्या कीटक नियंत्रण खात्याद्वारे गोशाळा व आजूबाजूच्या परिसरात योग्य त्या उपाययोजना करण्यास देखील प्रारंभ करण्यात आला आहे, अशीही माहिती डॉ. कलीमपाशा पठाण यांनी दिली आहे. त्याचबरोबर ज्यांच्या गोजातीय जनावरांचे लसीकरण झाले नसेल त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय आरोग्य खात्याकडे ०२२-२५५६-३२८४ आणि ०२२-२५५६-३२८५ या क्रमांकावर संपर्क साधून लसीकरणाबाबत विनंती नोंदवावी,असे आवाहन केले आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याने १२ सप्टेंबर २०२२ रोजीच्या परिपत्रकान्वये पशुवैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक यांचा समावेश असलेला चमू गठीत केला आहे. या चमुद्वारे मुंबईतील तबेले व गोशाळा यांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आलेले आहे. तसेच महानगरपालिकेच्या कीटकनाशक विभागास गोशाळा व आजूबाजूच्या परिसरात धआणि कीटक नियंत्रण करण्याबाबत उपाययोजना करण्यास सांगण्यात आलेले आहे. सन २०१९ च्या पशुगणनेनुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ३,२२६ गोजातीय जनावरे व २४,३८८ म्हैसवर्गीय जनावरे असून, प्राधान्याने ३,२२६ गोजातीय जनावरांचे लसीकरण या आठवड्यात पूर्ण करण्यात येणार आहे.

तबेले / गोशाळा मालक – चालक यांना पुढीलप्रमाणे सूचना करण्यात येत आहेत…

लम्पी चर्मरोगावर (एलएसडी) नियंत्रण, प्रतिबंध किंवा त्याचे निर्मूलन करण्याकरिता गोजातीय प्रजातींची सर्व गुरे व म्हशी यांची, ज्या ठिकाणी ते पाळले (ठेवले) जातात; त्या ठिकाणापासून नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी ने-आण करण्यास मनाई.

गोजातीय प्रजातींची बाधित असलेली कोणतीही जीवंत किंवा मृत गुरे व म्हशी, गोजातीय प्रजातींची कोणत्याही बाधित झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात आलेली कोणत्याही प्रकारची वैरण, प्राण्यांच्या निवा-यासाठी असलेले गवत किंवा अन्य साहित्य आणि अशा प्राण्यांचे शव, कातडी किंवा अन्य कोणताही भाग किंवा अशा प्राण्यांचे उत्पादन किंवा असे प्राणी, नियंत्रित क्षेत्राच्या बाहेर नेण्यासाठी कोणत्याही व्यक्तीस मनाई करण्यात येत आहे. बाह्य कीटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखावी. निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे. गायी व म्हशींना एकत्रित ठेवण्यात येवू नये. बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता व तसेच चराईकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी. गोठ्यात त्रयस्थांच्या भेटी टाळाव्यात. बाधित परिसरात स्वच्छता ठेवावी व निर्जंतुक द्रावणाची परिसरात फवारणी करावी. फवारणीसाठी १ टक्के फॉर्मलीन किंवा २ ते ३ टक्के सोडियम हायपोक्लोराईट, फिनॉल २ टक्के यांचा वापर करावा.

रोगाचा प्रसार कसा होतो…

 • प्रसार मुख्यत्वे चावणा-या माश्या (स्टोमोक्सीस), डास (एडीस), गोचीड, चिलटे (क्युलीकॉईडीस) यांच्यामार्फत होतो. तसेच या आजाराच्या विषाणूचा संसर्ग निरोगी व बाधित जनावरे यांच्यातील प्रत्यक्ष स्पर्शाने होऊ शकतो.
 • विषाणू संक्रमण झाल्यानंतर ते १-२ आठवड्यापर्यंत रक्तामध्ये राहतात व तद्नंतर शरीराच्या इतर भागात संक्रमित होतात. त्यामुळे नाकातील स्राव, डोळ्यातील पाणी व तोंडातील लाळेतून विषाणू बाहेर पडून चारा व पाणी दूषित होतो व त्यातून इतर जनावरांना या विषाणूचा प्रसार होऊ शकतो.
 • त्वचेवरील खपल्या गळून पडल्यानंतर त्यामध्ये विषाणू दीर्घकाळ (३५ दिवस) जिवंत राहू शकतात.
 • या रोगाचा फैलाव कृत्रिम किंवा नैसर्गिक रेतनातून होऊ शकतो.
 • गाभण जनावरांत या आजाराची लागण झाल्यास गर्भपात किंवा रोगग्रस्त वासरांचा जन्म होतो.
 • दूध पिणा-या वासरांना आजारी गायीच्या दुधातून व स्तनावरील व्रणातून रोगप्रसार होतो.

लक्षणे कशी ओळखाल

 • बाधित जनावरांमध्ये या आजाराचा सुप्तकाळ साधारणपणे २-५ आठवडे एवढा असतो.
 • या आजारामध्ये प्रथम जनावरांच्या डोळ्यातून व नाकातून पाणी येते.
 • लसिकाग्रंथींना सूज येते. सुरुवातीस भरपूर ताप येतो.
 • दुग्ध उत्पादन कमी होते. चारा खाणे, पाणी पिणे कमी होते.
 • त्वचेवर हळूहळू १०-५० मिमी व्यासाच्या गाठी प्रामुख्याने डोके, मान, पाय, मायांग, कास इत्यादी भागात येतात. काहीवेळ तोंड, नाक व डोळ्यात व्रण निर्माण होतात.
 • तोंडातील व्रणामुळे आजारा जनावरांना चारा चघळण्यास त्रास होतो.
 • डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येते तसेच डोळ्याची दृष्टी बाधित होते.
 • या आजाराच्या प्रादुर्भावामुळे फुफ्फुसदाह किंवा स्तनदाह आजाराची बाधा पशुंमध्ये होऊ शकते.
 • रक्तातील पांढ-या पेशी व प्लेटलेटची संख्या कमी होते. पायावर सूज येऊन काही जनावरे लंगडतात.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here