राज्यात आजपर्यंत लम्पी चर्मरोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या गोवंशीय पशुधनाच्या २ हजार ५५२ पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाईपोटी ६.६७ कोटी रुपये जमा करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली.
( हेही वाचा : अंधेरी पूर्व मतदारसंघात १ नोव्हेंबरपासून प्रचारबंदी )
लम्पी विषाणूच्या जनुकीय परीक्षणांतर्गत जिनोम क्रमवारीता तपासणीसाठी आवश्यक नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था पुणे येथे पाठविण्यात आले. या तपासणीमुळे विषाणूमधील जनुकीय स्तरावरील बदलांबाबतची माहिती नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात अपेक्षित आहे. तसेच लसीमुळे निर्माण होणाऱ्या प्रतिकारशक्तीचे मूल्यमापन करण्यासाठी आवश्यक नमूने ७ विभागांमधून प्रतिविभाग दोन गावातील पशुधनातील लसीकरणापुर्वीचे नमुने व लसीकरणानंतरचे ७, १४, २१ व २८ दिवसांचे रक्तजल नमुने संकलित करुन ते बंगळूरु येथील राष्ट्रीय रोगपरिस्थिती विज्ञान व रोगमाहिती संस्थेत पाठविण्यात आले आहेत. त्यांचे निष्कर्ष देखील नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
९७.३२ टक्के लसीकरण पूर्ण
- राज्यामध्ये २९ ऑक्टोबरअखेर ३३ जिल्ह्यांमधील एकूण ३ हजार १७६ गावांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण १ लाख ६१ हजार ६०९ बाधित पशुधनापैकी एकूण १ लाख ५ हजार ६०७ पशुधन उपचाराने बरे झालेले आहे. उर्वरित बाधित पशुधनावर उपचार सुरू आहेत.
- राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये शनिवारअखेर १४०.९७ लक्ष लस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामधून एकूण १३६.१५ लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे.
- जळगाव, अहमदनगर, धुळे, अकोला, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, वाशिम, जालना, हिंगोली, नंदुरबार आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे.
- खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांची आकडेवारी नुसार महाराष्ट्रात सुमारे ९७.३२ टक्के गोवंशीय पशुधनाला लसीकरण झाले असल्याचे सिंह यांनी सांगितले.