मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यामधील पेंच व्याघ्र प्रकल्पातील प्रसिद्ध कॉलरवाली वाघिणीचा (T-15) शनिवारी मृत्यू झाला आहे. १६ वर्षाच्या या वाघिणीने पेंच व्याघ्र प्रकल्पात अखेरचा श्वास घेतला. रय्यकसा कॅम्पअंतर्गत कुंभादेव कक्ष परिसरात वृद्धापकाळाने निधन झाले. सर्वाधिक बछड्यांना जन्म देण्याचा रेकॉर्ड या वाघिणीच्या नावावर आहे. या वाघिणीने २९ बछड्यांना जन्म दिला आहे.
(हेही वाचा –प्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचं वयाच्या 83 व्या वर्षी निधन)
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यापासून T-15 वाघिण अशक्त असल्याने पेंच व्याघ्र प्रकल्पात या वाघिणीवर देखरेख ठेवणे सुरू होते. मात्र, शनिवारच्या दरम्यान वाघिणीची हालचाल दिसून न आल्यामुळे वनविभागाच्या पथकाने शोध सुरू केला. शोधकार्यात ती घटनास्थळी मृतावस्थेत आढळली. शनिवारी सूर्यास्तावेळ सीताघाटजवळच्या भूरादत्त ओढ्याजवळ तिने अखेरचा श्वास घेतला. कॉलरवाली वाघिणीचा मृत्यू झाल्याने व्याघ्र प्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
तेव्हापासून कॉलरवाली वाघीण म्हणून प्रसिद्ध
मध्य प्रदेश राज्याला वाघांचे राज्य हे नावलौकिक मिळवून देण्यात कॉलरवाल्या वाघिणीची मोठी भूमिका आहे. तिचा जन्म सप्टेंबर २००५ मध्ये झाला. अ़डीच वर्षांची असताना तिने ३ बछड्यांना जन्म दिला. पण २४ तासातच त्यांचा मृत्यू झाला होता. २००८ ते २०१३ दरम्यान तिने १८ बछड्यांना जन्म दिला. ज्यामधील १४ बछडे जिवंत राहिले. २०१५ मध्ये तिने अजून ४ बछड्यांना जन्म दिला. आतापर्यंत ८ वेळा तिने २९ बछड्यांना जन्म दिला आहे. ११ मार्च २००८ रोजी भारतीय वन्यजीव संस्थान, देहरादूनमधल्या तज्ज्ञांनी या वाघिणीला रेडियो कॉलर घातली होती. तेव्हापासून कॉलरवाली वाघिण म्हणून तिला ओळखले जावू लागले.
Join Our WhatsApp Community