‘वरळीच्या महाराजा’लाच महापालिकेचा दे धक्का

117

वरळीतील डॉ.जी.एम. भोसले मार्गावरील अंसल हायईट्स सोसायटीजवळ बनवण्यात येणाऱ्या वरळीचा महाराजा चौक बनण्याआधीच महापालिकेच्यावतीने तोडण्यात आला आहे. पदपथावर बनवण्यात येणाऱ्या या चौकाचे बांधकाम अनधिकृत असल्याचे सांगत महापालिकेच्या जी दक्षिण विभागाने कारवाई केली आहे. विशेष म्हणजे अंसल हाईट्सने आक्षेप घेतल्याने महापालिकेने हे बांधकाम तोडल्याचे बोलले जात असून या इमारतीच्याबाहेरच पदपथावर बांधकाम केल्याने त्यांचेही सुशोभित केलेले काम वादात अडकले आहे.

( हेही वाचा : शिवाजी पार्कच्या हिरवळीसाठी रखवालदार! )

Worli Letter

ट्वीटरच्या माध्यमातून तक्रार

वरळीतील प्रभाग क्रमांक १९६ मधील जी.एम.भोसले मार्ग व चंद्रकांत श्रीधर राणे मार्ग हे गावडे मंडईजवळ जिथे एकमेकांना मिळतात,त्याठिकाणी होणाऱ्या टी चौकाला श्री गणेश सेवा मंडळ वरळीचा महाराजा चौक असे नाव देण्याचा प्रस्ताव २८ सप्टेंबर २०२१च्या महापालिकेच्या सभेत मंजूर करण्यात आला. त्यानुसार येथील श्री गणेश सेवा मंडळाने चौकाच्या ठिकाणी बांधकाम हाती घेतले होते. हे बांधकाम सुरु असतानाच येथील अंसल हाईट्समधील नागरिकांनी याला आक्षेप घेतला आणि शिवसेना आमदार व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे ट्वीटरच्या माध्यमातून तक्रार केली होती. त्यानंतर महापालिकेने या ट्वीटरवरील तक्रारीची दखल घेत त्यावर बुलडोझर चढवला. ही कारवाई करताना पदपथावर हे बांधकाम केले जात असल्याने कारवाई केल्याचे कारण जी दक्षिण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे.

सुवर्णमध्य काढणार

दरम्यान, येथील श्री गणेश सेवा मंडळाच्यावतीने मंडळाचे अध्यक्ष संतोष शेलार यांनीही डॉ.जी.एम.भोसले मार्गावर अंसल हाईट्स सोसायटीने पदपथावर अनधिकृत बांधकाम केल्याची तक्रार शिवसेना युवा सेनेचे उपविभाग अधिकारी अभिजित पाटील यांच्याकडे तक्रार केली असून त्यात त्यांनी या सोसायटीने सुशोभिकरणाच्या नावाखाली पदपथावर अनधिकृत बांधकाम केल्याचे म्हटले आहे. त्यानुसार ही बाब अभिजित पाटील यांनी महापालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत जर पदपथावर चौकाचे काम चालणार नसेल तर मग कोणतेच बांधकाम पदपथावर नसावे. ते नियमानुसार चालण्यासाठी मोकळे करावे, अशी भूमिका मांडली.

महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, चौकाच्या नामकरणासाठी चौथऱ्याचे बांधकाम सुरु होते. ते पूर्ण झाले नव्हते. त्यामुळे ते हटवण्यात आले आहे. मात्र याप्रकरणात सामंजस्याने मार्ग काढण्याचा प्रयत्न प्रशासनाच्यावतीने केला जात असून दोन्ही गटांना समोरासमोर बसवून यातून सुवर्णमध्य काढण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.