महाराष्ट्रातील विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन हे ७ डिसेंबर रोजी होणार होते. मात्र आता हिवाळी अधिवेशन एक आठवडा पुढे ढकलल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. हिवाळी अधिवेशन मुंबई येथे होणार अशी देखील चर्चा होती. मात्र याला विरोधी पक्षनेते आणि कॉंग्रेसच्या काही नेत्यांचा विरोध लक्षात घेता यंदाचे हिवाळी अधिवेशन नागपुरातच होणार असल्याची शक्यता आहे. मात्र अद्याप हिवाळी अधिवेशनाची अधिकृतपणे कोणतीही निश्चित अशी तारीख ठरविण्यात आलेली नाही.
हे कारण असण्याची शक्यता?
नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यासह विधान परिषदेच्या 6 जागांसाठी 10 डिसेंबर रोजी मतदान निवडणूक होणार आहे. या कारणांमुळे 7 डिसेंबर रोजी होणारं हिवाळी आधिवेशन पुढे ढकलण्यात येत असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशन पुढे ढकलले जाणार असल्याची चांगलीच चर्चा सुरू आहे. तर जर हे हिवाळी अधिवेशन पुढे ढकलले गेले तर अधिवेशनाची नवी तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, अशीही माहिती मिळतेय.
(हेही वाचा – ‘एसटी’नंतर ‘बेस्ट’च्या विलिनीकरणाची मागणी; ‘बेस्ट’ची चाकंही थांबणार?)
इथे होणार यंदाचे अधिवेशन
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विधिमंडळ सल्लागार समितीची बैठक झाल्यानंतर हिवाळी अधिवेशन मुंबई किंवा नागपूर कुठे आणि कधी घेण्यात येणार हे अधिकृतपणे जाहीर करण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता यंदाचे अधिवेशन मुंबईला घेण्यात येणार होते, मात्र विरोधकांचा विरोध असल्याने हे आंदोलन नागपुरातच होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
डोस घेतले तरी RTPCR अनिवार्य
कोरोनाचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही या अधिवेशनादरम्यान प्रत्येकाला कोरोना आरटीपीसीआर टेस्ट करणे अनिवार्य असणार आहे. त्यामुळे विधीमंडळ सदस्य, त्यांचे स्वीय सहायक, सर्व अधिकारी-कर्मचारी, वृत्तसंकलनासाठी येणारे माध्यम प्रतिनिधी, सुरक्षेसाठी तैनात असणारे पोलीस, राज्यभरातून येणारे वाहन चालक या सर्वांच्या आरटीपीसीआर टेस्ट अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पूर्ण करण्याची सूचना विधीमंडळाकडून करण्यात आली आहे.