मुंब्र्यातील रिझवानचे काय होते दहशतवादी कनेक्शन?

दिल्लीत अटक केलेल्या दहशतवादी मॉड्युलची माहिती होती व कटात त्याचा देखील सहभाग असल्याचे समोर येत आहे.

मुंबईतील जोगेश्वरी येथून अटक करण्यात आलेल्या जाकीर शेख या संशयितानंतर महाराष्ट्र एटीएसने मुंब्रा येथून रिझवान या संशयित दहशतवाद्याला रविवारी अटक केली आहे. रिझवान हा जाकीर हुसेन शेख याच्या संपर्कात होता. त्याला देखील जान मोहम्मद सारखी जबाबदारी सोपवण्यात येणार होती, अशी माहिती समोर येत आहे. रिझवानला दिल्लीत अटक केलेल्या दहशतवादी मॉड्युलची माहिती होती व कटात त्याचा देखील सहभाग असल्याचे समोर येत आहे.

कोण आहे जाकीर हुसेन शेख?

दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने अटक केलेल्या ६ दहशतवाद्यांपैकी जान मोहम्मद उर्फ समीर कालिया नूर मोहम्मद शेख हा मुंबईतील सायन धारावी येथील रहिवासी होता. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीस इब्राहिम याच्या सांगण्यावरुन तो आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेच्या इशाऱ्यावर मुंबईसह देशातील मुख्य शहरांमध्ये घातपातासाठी स्लीपर सेलला शस्त्रे आणि स्फोटके पुरवणार होता. जान मोहम्मदचा हँडलर जाकीर हुसेन शेख याला महाराष्ट्र एटीएसने जोगेश्वरी येथून अटक केली होती. जाकीरच्या विरोधात एटीएसने यूएपीए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

(हेही वाचाः दहशतवाद्यांच्या निशाण्यावर ‘ही’ होती ठिकाणे!)

रिझवानवर होती ही जबाबदारी

जाकीर हुसेन शेखच्या चौकशीत ठाणे जिल्हयातील मुंब्रा येथे राहणा-या रिझवानचे नाव समोर आल्यानंतर, एटीएसने रविवारी रिझवान शेखला मुंब्र्याहून अटक केली. रिझवान शेखवर देखील जान मोहम्मद सारखी महत्वाची जबाबदारी सोपवण्यात येणार होती. शस्त्रे आणि स्फोटके स्लीपर सेल पर्यंत पोहोचवणे व दहशतवाद्यांना राज्यात आश्रय देणे, यांसारख्या जबाबदा-या रिझवानवर सोपवण्यात येणार होत्या, अशी माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली आहे. रिझवानने कथितरित्या जान मोहम्मदचा मोबाईल फोन गायब करण्यात भूमिका बजावली होती. रिझवानला दहशतवादी मॉड्युलच्या कटाची माहिती होती, असा आरोप एटीएसने केला आहे. सोमवारी रिझवान आणि जाकीर शेख या दोघांना सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

(हेही वाचाः ‘या’ कामासाठी गेला होता जान मोहम्मद दुबईला!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here