राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढता असला तरी देखील राज्यातील नागरिकांना दिलासा मिळणारी बातमी समोर आली आहे. राज्यात कोरोना संसर्ग वाढत असला तरी राज्यात तूर्तास लॉकडाऊन न लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, वाढणारी गर्दी आणि रुग्णसंख्या बघता निर्बंध कडक करण्याचा विचार राज्यसरकारने केला आहे. तर आज रात्री उशीरापर्यंत नवीन नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे. मंत्रालयातील कोरोना आढावा बैठकीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सोपवला जाणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री काय कोणता निर्णय जाहीर करता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुख्यमंत्री आज निर्णय जाहीर करणार
आज, बुधवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात तासभर बैठक झाली. या बैठकीत जी चर्चा झाली त्याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिल्यानंतर मुख्यमंत्री आज निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितले जात आहे. टास्क फोर्स सोबत राज्यातील कोरेनाचा आढावा देखील या बैठकीत घेण्यात आला. यावेळी कोरोना संदर्भातील उपाययोजना करण्यासाठी निधीची कमतरता पडू देऊ नका. त्याचप्रमाणे निधीला कात्री लावू नका, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वित्त विभागाला आजच्या बैठकीत दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज रात्रीपर्यंत कडक निर्बंधाची नियमावली जाहीर होणार आहे, अशी माहिती आहे.
(हेही वाचा –न्यायालयात आता ‘माय लॉर्ड’, ‘युअर ऑनर’ हे ऐकायला मिळणार नाही, तर…)
काय आहे राज्यातील स्थिती
या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवारांसह आरोग्यमंत्री राजेश टोपे, आरोग्य सचिव, वैद्यकीय शिक्षण सचिव आणि मुख्य सचिवही उपस्थित होते. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात मंगळवारी 18 हजार 466 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 4 हजार 558 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आज 20 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर राज्यात सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 66 हजार 308 वर पोहोचली आहे. यासह राज्यात आज 75 ओमायक्रॉनबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 40 रुग्ण हे केवळ मुंबईतील आहेत. त्यामुळे राज्यातील ओमायक्रॉन रुग्णांची एकूण संख्या आता 653 वर पोहोचली आहे.
Join Our WhatsApp Community