Maharashtra Din  : संयुक्त महाराष्ट्र लढ्यात ‘कला’ बनली होती शस्त्र

या लढ्यात अनेक गोष्टी घडल्या, अनेक वेगवेगळ्या प्रकारांनी हा लढा लढला गेला.

294
Maharashtra Din  : संयुक्त महाराष्ट्र लढ्यात 'कला' बनली होती शस्त्र

कला ही मानवाने जाणीवपूर्वक घडवलेली गोष्ट आहे. कला ही भावनेचा अविष्कार असते. परंपरेनुसार साहित्य, चित्र, शिल्प, वास्तू, संगीत, नृत्य, नाटक या प्रमुख कला मानल्या जातात. आधुनिक काळात विज्ञान-तंत्रज्ञानामुळे चित्रपट आणि छायाचित्र या दोन कलांचा जन्म झाला. (Maharashtra Din)

 कला ही समाजाचे प्रतिबिंब असते. समाजात ज्या-ज्या गोष्टी घडतात त्या सर्व गोष्टींचा अप्रत्यक्षपणे कलेवर चांगला वाईट परिणाम होतांना दिसतो. असच काहीसं आपल्या महाराष्ट्रातील कलेच्या बाबतीतही घडलं आहे. (Maharashtra Din)

(हेही वाचाMauritius : मॉरिशसमध्ये शिवछत्रपतींचा जयजयकार ! महाराजांच्या १२ फूट उंचीच्या पुतळ्याचे अनावरण)

आपल्या संयुक्त महाराष्ट्र लढ्याला (Maharashtra Din) १ मे २०२३ रोजी ६३ वर्षे पूर्ण होत आहेत. या लढ्यात अनेक गोष्टी घडल्या, अनेक वेगवेगळ्या प्रकारांनी हा लढा लढला गेला. मात्र या लढ्यात शस्त्र म्हणून वापरलेल्या कलेने संयुक्त महाराष्ट्र चळवळीला एका वेगळ्या टप्प्यावर नेऊन ठेवले.

* संयुक्त महाराष्ट्राची चळवळ  

सर्व मराठी भाषिक प्रदेश एकत्र आणून त्या प्रदेशाचे महाराष्ट्र हे वेगळे राज्य निर्माण करावे, यासाठी मराठी भाषिकांनी जी मागणी केली, त्याला संयुक्त महाराष्ट्राची मागणी (Maharashtra Din) असे संबोधले जाते. मुंबईतील भांडवलदारांना जे मुख्यत: अमहाराष्ट्रीय होते त्यांचा मुंबई महाराष्ट्राला देण्यास विरोध होता. २८ नोव्हेंबर १९४९ रोजी मुंबई महापालिकेत संयुक्त महाराष्ट्राचा पहिला ठराव आचार्य अत्रे व डॉ. आर.डी. भंडारे यांनी ‘मुंबईसह महाराष्ट्र’चा ठराव शेडयुल्ड कास्ट फेडरेशनच्या वतीने मांडला. स्वातंत्र्यानंतर भाषिक राज्यांची मागणी होऊ लागली. आंध्र प्रदेश राज्याची मागणी पोट्टी श्रीरामल्लू यांच्या बलिदानानंतर पूर्ण झाली. मात्र भाषावार प्रांतरचेनेसाठी नेमलेल्या कमिशनाने महाराष्ट्र राज्याची मागणी डावलली. त्यानंतर महाराष्ट्रात असंतोषाची ठिणगी पेटली आणि ‘मुंबईसह महाराष्ट्र’ झालाच पाहिजे असे नारे सुरु झाले. अखेर १ मे १९६० रोजी १०६ हुतात्म्यांच्या बलिदानानंतर मुंबईसह महाराष्ट्र ही मोहीम फत्ते झाली.

हेही पहा

या चळवळीत आपली मतं सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख यांसारख्या वीरांनी ‘शाहिरी-पोवाडा’ या कलाप्रकाराला आपले शस्त्र बनवले. कॉ. डांगे, आचार्य अत्रे, सेनापती बापट, एस. एम जोशी, प्रबोधनकार ठाकरे, दादासाहेब गायकवाड यांसारख्या नेत्यांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम शाहिरांनी केले. (Maharashtra Din)

‘वन्ही तो चेतवावा, चेतविताचे चेततो’ या समर्थ रामदास स्वामी यांच्या वचनाप्रमाणे संयुक्त महाराष्ट्राचा वन्ही जसा नेत्यांनी चेतविला, तसाच तो शाहिरांनी आपल्या काव्यातून आणि डफातून सतत पेटता ठेवला. शाहीर अमरशेख, शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर गवाणकर, शाहीर आत्माराम पाटील, शाहीर लीलाधर हेगडे, शाहीर जंगम स्वामी, शाहीर राजाभाऊ बेणी, शाहीर नामदेव कापडे, शेख जैनू चांद, इंदायणी पाटील, बी.नीलप्रभा हे आणि असे ज्ञात आणि अज्ञात शाहीर, महिला कलावंत संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे शिलेदार ठरले. (Maharashtra Din)

*शाहीर आणि पोवाडा म्हणजे काय?

शाहिरी वाङमय म्हणजे मुख्यतः पोवाडे, लावण्या आणि लावण्यांतच मोडणारी भेदक कवने. एखाद्या वीराचा पराक्रम, राज्यकर्त्यांचे गुणगान, दुष्काळ, दंगे यांसारखे देशावर कोसळलेले संकट, तीर्थक्षेत्राचे किंवा राजधानीचे वर्णन इत्यादी विषयांवर पोवाडे रचले जातात. शाहिरी रचनेतील जुन्यात जुने पोवाडे हे शिवकालीन आहेत.
‘पवाड’ हा शब्द ‘महत्त्व, सामर्थ्य, विस्तार, विस्ताराने वर्णन, पराक्रम’ या अर्थांनी ज्ञानेश्वरीत वापरला गेला आहे. पोवाडे गाऊन समाजाचे प्रबोधन करणे आणि त्यातून समाजाला विचारांची दिशा देणे असे सामाजिक आणि ऐतिहासिक काम शाहीर करतात. तत्कालीन ज्वलंत विषयावर समाज प्रबोधन व्हावे यासाठी देखील शाहीर समाजाला संबोधित करतात.

दिल्लीच्या तख्ताला धडक देत संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अमर शेख यांनी ‘जागा मराठा आम जमाना बदलेगा’ अशी डरकाळी फोडली. शाहिरांनी तेव्हा कवनांसोबतच अकलेची गोष्ट, निवडणुकीत घोटाळे, बेकायदेशी, माझी मुंबई, शेटजींचे इलेक्शन इत्यादी विषयांना हात घातला.

१९४८ च्या ऑक्टोबर महिन्यात संयुक्त महाराष्ट्र परिषदेत अण्णाभाऊ साठे यांनी
मुंबईच्या मागणीवर मुनीमजी म्हणतात-
नाना भाषेची ।अनंत जातीची । तूच मागशी कशी हिला?
विष्णू उत्तर देतो –
जशी गरुडाला पंख । आणि वाघाला नखं । तशी ही मराठी मुलुखाला ।।
मुनीमजी –
आम्ही सोडून घरदार । हिचा वाढवाया व्यापार । पैकी पेरीला का बोला?
विष्णू –
नदीला बगळा । जमून सगळा । टपून बसतो कशाला?
अशाप्रकारे सवाल जवाबाच्या माध्यमातून आपले विचार मांडले.

शाहीर अण्णाभाऊ साठे यांचे सहकारी शाहीर अमरशेख आणि शाहीर गवाणकर यांच्या ‘लाल बावटा’ कलापथकाने अवघ्या महाराष्ट्राचे मंथन केले. एक बेरोजगार तरुण मुंबईत पोट भरण्यासाठी येतो. मात्र याच वेळी सुरु असलेला संयुक्त महाराष्ट्राचा लढा पाहून केवळ स्वतःपुरता विचार न करता, महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी ठेवण्याच्या कारस्थानाला कामगार वर्गाने कसा विरोध केला हे अण्णाभाऊ साठे यांच्या ‘माझी मैना गावाकडे राह्यली । माझ्या जीवाची होते या काहिली ।’ या सुप्रसिद्ध  कवनातून मांडले गेले.

तसेच शाहीर आत्माराम पाटील यांचा
संयुक्त महाराष्ट्र उगवतोय माझ्या सरकारा । खुशाल कोंबडं झाकून धरा ।।
द्विभाषिकांचा दुतोंडी कावा । उडतोय माझा डोळा डावा ।।
साडेतीन कोट सिंहाचा छावा । पकडाया मांडलाय पिंजरा नवा ।।
हा संयुक्त महाराष्ट्राचा गोंधळ तर प्रत्येकाच्या ओठांवर होता.

केवळ महाराष्ट्रातच (Maharashtra Din) नव्हे तर दिल्लीकरांनीही या चळवळीला पाठिंबा दिला. मात्र कला ही केवळ मनोरंजनासाठीच असते या अशा माणसांच्या विचारसरणीमुळेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील शाहिरांचे हे योगदान काहीसं दुर्लक्षित राहीलं आहे. त्यामुळेच या वर्षीच्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने या लढ्यातील कलाकारांच्या कलेचा आढावा घेणं गरजेचं आहे.

लेखिका – श्रुतिका कासार
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.