“देशावर प्रेम करावे आणि स्वराज्य आपला मंत्र मानावे”, असा संदेश १ मे १९६० (Maharashtra Din) रोजी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी जनतेला दिला आणि १५ वर्षांच्या प्रदीर्घ चळवळीनंतर तमाम मराठी माणसाचे स्वप्न पूर्ण झाले. हा लढा सोपा नव्हता, स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांतरचनेची मागणी वाढीस लागली आणि इ.स. १९४६ पासून मराठी भाषिक राज्याची मागणी करणारी संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू झाली. संयुक्त महाराष्ट्रासाठी मुंबईसह राज्यातील विविध भागांमध्ये विशेषत: सीमा भागात जोमाने आंदोलन सुरू होते आणि या आंदोलनात स्त्रियांचा सुद्धा लक्षणीय सहभाग होता.
…आणि स्त्रियांनी चळवळीत उडी घेतली
संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा (Maharashtra Din) आपण एकूण अभ्यास केला तर दार कमिशन (१९४७), जे.व्ही.पी. समिती (१९४८), फाजलअली कमिशन अहवाल ( राज्यपुनर्रचना आयोग), नागपूर करार (१९५३) या दरम्यान स्त्रिया फार सक्रिय नव्हत्या. परंतु या चळवळीच्या मध्यांतरानंतर जेव्हा १० ऑक्टोबर १९५५ मध्ये पुनर्रचना आयोगाने द्विभाषिक विशाल मुंबई राज्याची घोषणा केली. तेव्हा राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत महिलांनी पुढाकार घेतला. यावेळी मृणाल गोरे, तारा रेड्डी, अहिल्या रांगणेकर, प्रमिला दंडवते, सुधा काळदाते, अनुताई लिमये या महिला नेत्यांनी मुंबईतील विविध भागांमधील स्त्रियांना आंदोलनात उतरवले.
(हेही वाचा – रायगडावर १, २ जूनला ३५०वा शिवराज्याभिषेक सोहळा राज्य शासन साजरा करणार)
रणरागिणींचा नारा
सरकारच्या त्रिराज्य योजनेविरुद्ध १८ नोव्हेंबर १९५५ रोजी निघालेल्या मोर्चात सेनापती बापट, आचार्य प्र.के. अत्रे, लालजी पेंडसे, मधु दंडवते यांना अटक करण्यात आली. ही बातमी कळताच समाजात अस्वस्थता निर्माण झाली. यादरम्यान सुद्धा सत्याग्रही स्त्रियांची तुकडी सक्रिय होती. तारा रेड्डी, प्रमोदिनी तायशेट्टे, सुनंदा देसाई, निर्मला कुलकर्णी या महिला नेत्यांना अटक करण्यात आली. साताऱ्यात नाना पाटील यांच्या कुटुंबियांना पोलिसांनी रात्री गावाबाहेर सोडून दिले, यात त्यांची आई व मुलीचा सहभाग होता. कराडमध्ये मंगलाबाई पवार यांच्या नेतृत्त्वात सुपते गावातून १०० बैलगाड्यांमधून जवळपास ५०० ते ६०० स्त्रियांनी मोर्चा काढला यावेळी अंजली पाटीस, प्रेमलाकाकी चव्हाण, शालन पाटील या स्त्रियांनी भाषणे केली. याशिवाय दिल्लीतील सत्याग्रहात २५० महिला सहभागी होत्या. अन्नपूर्णा भांडारकर, माई एरंडे, पार्वतीबाई वैद्य, कमल डोके, शांता रानडे, कमल भागवत, अंबुताई टिळेकर अशा अनेक लढाऊ स्त्रियांचे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत योगदान आहे. (Maharashtra Din)
हेही पहा –
अजूनही लढा अपूर्णच
केवळ सत्याग्रह, सशस्त्र उठावचं नाहीतर, त्या पलीकडे जाऊन महिलांनी पोवाडा, काव्य रचून समाजाचे प्रबोधन केले. अशा महिला शाहिरांमध्ये इंद्रायनी पाटील, अनुसयाबाई आनंदराव शिंदे, लिलुताई म्हापणकर, कुसुमताई गायकवाड, बी.नीलप्रभा, केशर जैनू चांद यांचा समावेश आहे. शाहीर अनुसयाबाई शिंदे यांना तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या हदगाव तालुक्यातून हद्दपार केले होते, त्यामुळे त्या इतर भागात आपला कार्यक्रम सादर करताना म्हणत,
“एक पाय तुमच्या गावात | दुसरा तुरूंगात किंवा स्वर्गात
तमा नाही याची अनुसयाला|
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे|
त्याचसाठी वाणीचा हिला चेतविला| जी….जी|”
या महिला शाहिरांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे विचार, महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवून स्त्रियांना या लढ्यात सहभागी होण्यास प्रवृत्त केले. चळवळीदरम्यान जनजागृती करत समाजाचे प्रबोधन केल्यामुळे या संपूर्ण आंदोलनाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढील लागली आणि संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती जवळ आली. १ मे १९६० रोजी भारतीय संघराज्यात मुंबईसह मराठी भाषी लोकांचा संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला परंतु आजही बेळगाव, निपाणी, कारवार, डांग व भालकीचा प्रश्न अनुत्तरीत आहे.
महाराष्ट्र अस्तित्वात आल्यावर ४ प्रमुख विभाग व २६ जिल्हे
मुंबई विभाग :- बृहन्मुंबई, ठाणे, कुलाबा, रत्नागिरी, नाशिक, धुळे, जळगाव
पुणे विभाग :- पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर
नागपूर विभाग :- नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, अकोला
औरंगाबाद विभाग :- औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी, उस्मानाबाद.