- अच्युत पालव
दासबोधात समर्थ रामदास स्वामींनी ‘अक्षरां’चं वर्णन केलं आहे. शाई कशी असावी, कागद कसा असावा, अक्षरं कशी असावीत, शाई कशी तयार केली जाते, ती कशी घोटावी इत्यादी. ज्यावेळी सुलेखनकार म्हणून मीही भाषेकडे बघतो, तेव्हा सर्वप्रथम या मुद्द्यांकडेही लक्ष देतो. कुठलीही भाषा लिहायची अथवा वाचायची असेल, तर त्याआधी ती आत्मसात करणं गरेजचं असतं. लिहिण्याकरितासुद्धा त्या भाषेचा गोडवा, तिची व्याप्ती, भाषेचं मूळ काय आहे, याचा अभ्यास करावा लागतो. (Maharashtra Din 2024)
अक्षरं लिहिण्यामागचा मूळ इतिहास काय आहे. तो जर मला कळला, तर त्या अर्थानुसार काम करता येतं. संकल्पना सुचत जातात. वारंवार ‘भाषे’चा अभ्यास केला की, त्याची व्याप्ती कळत जाते. मराठी भाषेचा विचार करताना आपण ‘ज्ञानेश्वरी’कडे जातो. पसायदानात ज्ञानेश्वरांनी इतका सुंदर विचार मांडून ठेवला आहे की, सुंदर भाषेचं वर्णन कवी कुसुमाग्रज, इंदिरा संत, ना. धो. महानोर, मंगेश पाडगावकर यांनी केलं आहे. या भाषेवरचा पगडा समाजमानावर बसणं, तिची बोलण्याची पद्धत कशी बदलत गेली, वेगवेगळ्या लेखकांनी ती वेगवेगळ्या, वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने मांडली आहे. हे सगळं जेव्हा तुम्हाला कळायला लागतं तेव्हाच तिचं आकलनही व्हायला लागतं. कॅलिग्राफीमध्ये हाती अक्षरे लिहिताना कोणतीही भाषा आधी आतून कळणं महत्त्वाचं आहे. हे एकदा कळलं की तिची गोडी जाणवत राहते. (Maharashtra Din 2024)
कॅलिग्राफीची स्वतंत्र शैली…
कॅलिग्राफीतली अक्षरं वळणदार असतात, ते लिहिण्याची स्वतंत्र शैली आहे. आपण सातत्याने पोथ्यांचा अभ्यास करत आलोय. संत तुकाराम, संत रामदास यांचं अक्षर. त्या काळात अक्षरे कशी लिहिली गेली. शाई, बोरू इत्यादी साहित्याचा अक्षरे लिहिण्यासाठी वापर केला जातो. शाई कशी तयार केली जाते. उत्तरेकडे ताम्रपत्रावर लिहिलं जात होतं. हे सगळं लिहितानाही लिहिण्याच्या काही मर्यादा होत्या. भुजपत्रावर लिहिताना जलद गतीने लिहिता येत नव्हतं. तुटक तुटक लिहावं लागायचं. प्रत्येक भाषेचं सौंदर्य वेगळं असतं. एकदा तुम्ही भाषेचा अभ्यास करायला लागलात की, ती सतत तुम्हाला वेगळं काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असते. ते आत्मसात करायला शिकलं पाहिजे. (Maharashtra Din 2024)
मातृभाषेवरचं प्रेम कमी होत आहे…
२००७ साली भारतभर फिरलो. तेव्हा माझ्या लक्षात आलं की, ‘कॅलिग्राफी’ म्हणजे काय ते लोकांना माहितच नाही. आर. के. जोशींनी सुलेखनावर खूप काम केलं आहे. सुंदर हस्ताक्षर म्हणजे कॅलिग्राफी हे फार कमी लोकांना माहिती होतं, कारण मातृभाषेवर लोकांचं हल्ली प्रेमच कमी झालं आहे. आजच्या तरुणाईला इंग्रजी भाषा शिकण्यात जास्त रस वाटतो, कारण त्यांना जपान, अमेरिकेला जायचंय. कोणीही असं म्हणत नाही की, मी पुण्याला भाषेचा अभ्यास करायला जातोय. भाषेविषयी कमी झालेली ही आत्मियता वाढवायची असेल, तर तिचं सुंदर रूप लोकांसमोर मांडलं पाहिजे. लोकांमध्ये कॅलिग्राफीविषयी जागरुकता असणं आवश्यक आहे. (Maharashtra Din 2024)
(हेही वाचा – Shishir Shinde : माजी आमदार शिशिर शिंदे यांची ३ लाख रुपयांची फसवणूक)
भाषेला स्वत:चं सौंदर्य
‘मराठी’ ही माझी मातृभाषा आहे. महाराष्ट्रात आपला जन्म झाला आहे. तिचा विकास झाला पाहिजे. ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. ती बोलली गेली पाहिजे. तिचा इतिहास लोकांना कळला पाहिजे. आता फक्त निवडणुका जवळ आल्या की, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या चर्चा होतात. त्यानंतर विरून जातात. असं नको व्हायला. ही सल माझ्या मनात आहे. भाषा ही केवळ अभिजात दर्जा मिळावा म्हणून ‘राजभाषा’ आहे, असे नाही. तर प्रत्येक भाषेला स्वत:चं सौंदर्य आहे. तिची स्वतंत्र शैली आहे. त्यामुळे प्रत्येक भाषेचा विकास होण्यासाठी ती सर्व स्तरावरील लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. याकरिता ‘कॅलिग्राफी’ या कलेच्या माध्यमातून आम्ही विविध उपक्रम राबवतो. पावसात छत्र्यांवरील कॅलिग्राफी, मराठी भाषा दिनानिमित्तही कॅलिग्राफी या विषयावर कार्यक्रम सादर केले जातात. जेणेकरून मराठी भाषेचा प्रसार व्हावा तसेच परदेशातही मराठी कॅलिग्राफी विषयात काम सुरू असतं. पॅरिसमध्ये संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज यांच्या साहित्यावर आधारित काम आम्ही केलं आहे. मला एका गोष्टीचा प्रचंड अभिमान वाटतो की, परदेशात मराठी भाषा लिहिली जाते. दिमाखात आपल्या मराठी भाषेची भिंतीवर लागलेली पाटी इथे लिहिलेली दिसते. त्याखाली तिचं फ्रेंच आणि इंग्रजी भाषेमध्ये भाषांतर केलेलं वाचायला मिळतं. (Maharashtra Din 2024)
मराठी तरुणांना सल्ला
जास्तीत वाचन-लेखन करा. आज मराठी पुस्तकांची विक्री कमी झाली आहे, असं वारंवार सांगितलं जातं. याविषयी ऐकलं की, वाईट वाटतं. त्यामुळे लोकांसमोर आपली भाषा सादर करायला हवी, तिचं सौंदर्य उलगडून दाखवलं की, तिची थोरवी इतर भाषिकांच्याही लक्षात येते. (Maharashtra Din 2024)
लोकांच्या उत्पन्नाचं साधन
गेली ४० वर्षे ‘कॅलिग्राफी’ या कलेत काम करतोय. तेव्हा कुठे आज लोकांना ही कला हळूहळू कळू लागली आहे. हे चित्र आता कुठे दिसू लागलं आहे. विद्यार्थी शिकायला येतात. स्वत:चा स्वतंत्र व्यवसाय सुरू करतात, हे पाहून खूप छान वाटतं. काही रशियन मुलं माझ्याकडून देवनागरी भाषा शिकून गेली. याचा मला खूप आनंद वाटला. भारतात शिकून गेल्यानंतर रशियात गेल्यावर त्यांनी तिथे स्वत:चं स्वतंत्र प्रदर्शन केलं. भाषेचा प्रचार होतो तेव्हा भाषेची गोडीही लोकांच्या मनापर्यंत पोहोचते. आता कॅलिग्राफी ही कला लोकांच्या उत्पन्नाचं साधनही झालेली पाहायला मिळाली आहे. (Maharashtra Din 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community