दहावी-बारावी परीक्षांसाठी नवे नियम जाहीर! परीक्षेसाठी किती वेळ दिला जाणार? वाचा…

परीक्षा ठरल्याप्रमाणे लेखी स्वरुपातच होणार असून, ठरलेल्या वेळापत्रकानुसारच घेण्यात येणार आहेत. पण...

दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत शालेय शिक्षण विभागाकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या परीक्षा ठरल्याप्रमाणे लेखी स्वरुपातच होणार असून, ठरलेल्या वेळापत्रकानुसारच घेण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. तसेच या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाकडून काही नवीन नियम जाहीर केले आहेत.

अतिरिक्त वेळ देणार

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत या परीक्षांबाबत नवीन माहिती दिली आहे. नवीन नियमावलीनुसार, १०वी आणि १२वीच्या लेखी परीक्षांसाठी परीक्षा केंद्रे ही विद्यार्थी शिकत असलेल्या शाळा अथवा महाविद्यालयातच असणार आहे. तसेच वर्ग संख्या कमी पडल्यास इतर शाळांमध्ये बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच ८० गुणांच्या लेखी परीक्षेसाठी अर्ध्या तासाचा अतिरिक्त वेळ देण्यात येणार आहे. ४० आणि ५० गुणांच्या परीक्षेसाठी १५ मिनिटांचा वेळ वाढवून दिला जाणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रत्याक तासाला २० मिनिटे वाढवून देण्यात येणार आहेत.

(हेही वाचाः पुण्यात विद्यार्थ्यांना जनावरांसारखी वागणूक!)

अशी आहे नियमावली

  • दहावी-बारावी परीक्षा ऑफलाईन(लेखी) पद्धतीने होणार.
  • लेखी परीक्षा ही विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या शाळेतच घेण्यात येणार.
  • वर्गखोल्या कमी पडल्यास जवळच्या शाळेतच बैठक व्यवस्था केली जाणार.
  • ८० गुणांच्या परीक्षेसाठी ३० मिनिटांचा वाढीव वेळ देण्यात येणार.
  • ४० आणि ५० गुणांच्या परीक्षेसाठी १५ मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात येणार.
  • दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रत्येक तासाला २० मिनिटांचा वाढीव वेळ मिळणार.
  • प्रॅक्टिक्ल(प्रत्यक्षिक) परीक्षा असािनमेंट पद्धतीने होणार.
  • विद्यार्थ्याला परीक्षा काळात कोरोनाची लागण झाल्यास त्यासाठी विशेष परीक्षेचे आयोजन करण्यात येणार.
  • ही विशेष परीक्षा जून महिन्यात घेण्यात येणार.

प्रात्यक्षिक परीक्षा कशा होणार?

१०वीच्या प्रात्यक्षिक परीक्षा दरवर्षी घेतल्या जातात. पण सध्या असलेल्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे विशिष्ट लेखन कार्य गृहपाठ(असाइनमेंट) पद्धतीने या प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना हा गृहपाठ २१ मे २०२१ ते १० जुलै २०२१ या काळात सादर करावा लागणार आहे. १२वीच्या प्रत्यक्षिक परीक्षा या २२ मे ते १० जून या काळात होणार आहेत. कला, वाणिज्य, व्यावसायिक अभ्यासक्रम शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षेनंतर १५ दिवसांत आपल्या असाइनमेंट महाविद्यालयात सादर करायच्या आहेत. मात्र, १२वी विज्ञान शाखेच्या प्रात्याक्षिकांची संख्यादेखील कमी करण्यात आली आहे.

कधी आहेत परीक्षा?

राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाने गेल्या आठवड्यात इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या कालावधीत, तर इयत्ता दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here